अमरावती : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. एकदा कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर त्यांना पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन करत काळजी घेण्यासाठी देखील सांगितलं आहे.
माझी कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) February 19, 2021
बच्चू कडू ट्विट करत म्हणाले, 'माझी कोरोना चाचणी दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची घ्यावी. आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्या.'
पहिल्यांदा बच्चू कडू यांना कोरोना झाला होता तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर कोरोना चाचणी केल्यावर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. आता पुन्हा चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली जात आहे.
देशातील कोरोनाचं सावट गेल्या काही दिवसांपासून कमी होत असल्याचं दिसून येत होतं. पण आता पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने अनेकांचे प्राण घेतले, तर अद्यापही काही रुग्ण उपचार घेत आहेत.