'झी 24 तास' इम्पॅक्ट : विटभट्टीवर बच्चू कडुंची बैठक, घेतला हा निर्णय

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज सकाळी विट भट्टीवरच बैठक घेतली.

Updated: Feb 24, 2020, 03:38 PM IST
'झी 24 तास' इम्पॅक्ट : विटभट्टीवर बच्चू कडुंची बैठक, घेतला हा निर्णय title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती शहरानजीक अंजनगाव बारी येथे वीटभट्टी मजुरांच्या मुलांसाठी शेतात सुरू झालेल्या जिल्हा परिषदेच्या वीटभट्टी शाळेचे वास्तव 'झी 24 तास'ने दाखवले होते. यानंतर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज सकाळी विट भट्टीवरच बैठक घेतली. बेघर आणि कामगारांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी अमरावती जिल्ह्यात एक वेगळा पॅटन राबविल्यानंतर हा पॅटन संपूर्ण राज्यभर राबवणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

मेळघाटातील हजारो कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करून अमरावती नजीकच्या अंजनगाव बारी रोड नजीक वीटभट्टीवर काम करण्यासाठी येतात. यातच शिक्षणारे मुलंही आपल्या आईवडीला सोबत येतात. त्यामुळे सहा महिने त्यांचे शिक्षण वाया जात होते. 

परंतू जिल्हा परिषद प्रशासन, जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने एका शेतात विद्यार्थ्यांसाठी विट भट्टी शाळा उभारण्यात आल्याची बातमी 'झी 24 तास'ने दाखवली होती.

या बातमीची दखल घेत सहा दिवसापूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळेला भेट देऊन ही शाळा पुढील दोन महिन्यासाठी परिसरातील एका शाळेत स्थलांतर करण्यास सांगितले. वाहनाचा खर्च म्हणून तात्काळ साठ हजारांची मदत करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रति संवेदनशीलता दाखवली. तर आज सकाळी या विट भट्टीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठक घेतली.

येथील 108 विद्यार्थ्यांच्या आजूबाजूच्या 5 शाळेत व्यवस्था करून त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रशासन घेणार असे त्यांनी सांगितले. 

राज्यभरातील भटक्या आणि मजुरांच्या तसेच विट भट्टी मधून मजुरांचे मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे अमरावतीत राबविण्यात आलेली योजना महाराष्ट्रभर राबवू असे राज्यमंत्री बच्चू कडू म्हणालेत.