आरोपीला आमच्या ताब्यात द्या... मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जनतेच्या संतापाचा उद्रेक; बदलापूरचे आंदोलन आणखी पेटणार

Badlapur Sexual Abuse: सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन  बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. मात्र, येथे त्यांना जनतेच्या उद्रेकाचा सामना करावा लागला.   

वनिता कांबळे | Updated: Aug 20, 2024, 04:20 PM IST
आरोपीला आमच्या ताब्यात द्या... मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जनतेच्या संतापाचा उद्रेक; बदलापूरचे आंदोलन आणखी पेटणार title=

Badlapur Case Girish Mahajan: बदलापूरचे आंदोलन आणखी पेटणार आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन सुरु आहे. अगदी सुरुवातीला बदलापूरकरांनी शाळेबाहेर गर्दी केल्यानंतर काही वेळात बदलापूरकरांनी रेलरोको करत रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी केली. बदलापूरकरांच्या संतप्त भावना लक्षात घेता पोलिसांचा मोठा ताफा रेल्वे स्थानकावर आला. मात्र यावेळी आंदोलकांकडून काही प्रमाणात दगडफेकही करण्यात आली. आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी लावून धरली. फाशीचे दोर हाती घेऊन बदलापूरकरांनी या घटनेचा निषेध केला. आदोलकांची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकात दाखल झाले. गिरीश महाजन यांच्यासमोर जनतेच्या संतापाचा उद्रेक पहयाला मिळाला. गिरीश महाजन आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करत आहेत. मात्र, जनतेची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. 

बदलापूरमधील घटनेची SIT मार्फत चौकशी करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

बदलापूरमधील घटना दुर्दैवी असून, याप्रकरणी आवश्यक ती कारवाई वेगानं सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  याप्रकरणी SITमार्फत तपास केला जाणार असून, वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्याचा प्रस्ताव दिल्याचंही ते म्हणाले. 

बदलापूर-कर्जत रेल्वे सेवा ठप्प 

बदलापुरातील नामांकित शाळेत 4 वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतापाचा उद्रेक पहायला मिळाला.. संतप्त पालक आणि नागरिकांनी रेल्वे आणि रस्ते वाहतूक अडवून धरली.. बदलापूर रेल्वे स्थानकात संतप्त पालकांनी रेल रोको आंदोलन केलंय. त्यामुळे बदलापूर-कर्जत रेल्वे सेवा ठप्प झालीये... बदलापूर स्थानकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी पालक आणि नागकांनी केलीये.. तर दुसरीकडे शाळेतही संतप्तप पालकांनी तुफान तोडफोड केलीये..