Maharashtra Bandh on 24th August: महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बदलापूरमधील लैंगिक अत्याचार (Badlapur Sexual Assault) प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेत या बंदमागे नेमकं कारण काय? यासंबंधी माहिती दिली आहेत. तसंच त्यांनी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. हा बंद कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून माता भगिनींच्या रक्षणासाठी किती जागरुक आहोत हे दाखवण्यासाठी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
"या बंदमध्ये राजकारण नाही. हा विकृतीचा व्हायरस आहे. कोणीही असं कृत्य करण्याची हिंमत व्हायला नको. जर कोणी केली तर त्याला ताबडतोब कठोर शिक्षा होते ही भीती विकृतांच्या मनात निर्माण कऱण्यासाठी हा बंद करत आहोत. सुरक्षित बहिण ही प्राथमिकता असली पाहिजे. जर बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात. 24 ऑगस्टला महाराष्ट्रातील तमाम जनतेने जात, पात धर्म बाजूला ठेवावे. जर मुलगी शाळेत सुरक्षित नसेल तर शिक्षणाचा अर्थ काय?", असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
"कडेवरच्या मुलांवर अत्याचार झाल्यानंतर ते घाबरुन शांत बसतात. जर अत्याचार उघड झाल्यावर पोलीस शांत बसणार असतील तर जनतेने करायचं काय? हे परवापासून जे घडत आहे तो जनतेचा उद्रेक आहे. त्याला वाचा फो़डण्यासाठी हा 24 ऑगस्टचा बंद करत आहोत. हा बंद कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून माता भगिनींच्या रक्षणासाठी किती जागरुक आहोत हे दाखवण्यासाठी आहे. सर्वांनी हा बंद पाळला पाहिजे," असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे; त्या प्रत्येकाने हा बंद पाळला पाहिजे. नराधमांना धडा शिकवला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, "गेल्या आठवड्यात बंगालमध्ये असंच कृत्य घडलं यानंतर देशभरात निषेध झाला. निर्भयानंतरही देश खडबडून जागा झाला होता. अशीच ही एक घटना आहे. जेव्हा सहनशीलतेचा अंत होतो तेव्हा उद्रेक होतो. तो क्षण जवळ येत चालला आहे".
एकनाथ शिंदे यांनी आंदोलनामागे विरोधक असल्याचा आरोप केला आहे असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "निवडणूक डोळ्यामसोर ठेवून राबवलेली ही योजना नव्हती. ठाणे जिल्ह्यात बदलापूर येतं. ही घटना त्यांना मान्य आहे का? हे दुष्कृत्य ते अमान्य करत आहेत? काल मुख्यमंत्री कुठे होते. राज्यभर निषेध होताना रत्नागिरीत लाडक्या बहिणीसाठी हात पसरुन राखी बांधून घेत होते. राखीच्या बंधनाला तरी जागा, किती निर्लज्ज व्हायचं. मुख्यमंत्र्यांनी तसं वाटणं स्वाभाविक आहे. कारण ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या अकलेचा दिवाळखोपरणाबद्दल मी बोलणार नाही".