Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election) किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने (Thackeray Faction) मांडली आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या या मागणीने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच ज्याच्या सर्वाधिक जागा, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मान्य नसल्याचं सार्वजनिक सभेत म्हटलं आहे. यामुळं एकमेकांच्या जागा पाडल्या जातील अशी भितीही त्यांनी व्यक्त केली होती.
16 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करा, आपण त्या चेह-याला पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं. परंतु यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने ठोस उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळं पुन्हा आता किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची भूमिका ठाकरे गटाने व्यक्त केल्याची सुत्रांची माहिती आहे.
षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेते या मेळाव्याला उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं होतं की, "मी मुख्यमंत्रीपद सोडलं ते महाराष्ट्रासाठी. मी माझ्यासाठी लढत नसून महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतो आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आताच जाहीर करावा. त्याला माझा पाठिंबा आहे".
‘लोकसभेची लढाई संविधान वाचवण्याची होती, विधानसभेची लढाई महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र संस्कृती वाचवण्याची आहे. ‘मविआ’चे दूत म्हणून गावागावात जा आणि आपल्या कामाचा प्रचार करा. वज्रमूठ शब्दात नको, ती प्रत्यक्षात हवी. उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल. पण त्यांना झोपवू याची शपथ घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं होतं.
खासदार संजय राऊत यांनीही महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचे थेट संकेत दिले होते. “मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केल्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं ठरू शकतं. लोकांनी याआधी उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे. ते महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होते. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मतदान केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनू शकतात. त्याचबरोबर बिनचेहऱ्याचं सरकार किंवा बिनचेहऱ्याची आघाडी चालणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले होते.