खरंच प्रभू श्रीरामचंद्र मुंबईत आले होते का?

वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाची रंजक कहानी जाणून घेवूया. 

वनिता कांबळे | Updated: Apr 16, 2024, 02:55 AM IST
खरंच प्रभू श्रीरामचंद्र मुंबईत आले होते का? title=

Walkeshwar Banganga Mumbai : सपनो का शहर... देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबई शहराची ओळख. याच मुबंईची आणखी एक वेगळी ओळख आहे. ही ओळख म्हणजे मुबंईचा ऐतिहासिक वारसा. मुंबई शहर हे एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ देखील आहे. मुंबईतील पर्यटन स्थळांपैकी पैकीच एक आहे दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर परिसरात असलेला बाणगंगा तलाव. बाणगंगा तलाव परिसर हा प्रभू श्रीरामचंद्र याच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर असल्याची अख्यायीका आहे. वाळकेश्वर येथील बाणगंगा परिसराची कहानी अतिशय रंजक आहे.     

अवाढव्य मुंबईत प्रचिन इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आजही पहायला मिळतात. त्यापैकीच एक वाळकेश्वर येथील बाणगंगा. बाणगंगा मंदिर अठराव्या शतकात उभारलं आहे. मात्र, या मंदिराचा थेट संदर्भ पार प्रभू रामचंद्रांशी जोडला जातो. यामुळेच बाणगंगा परिसराला पौराणिक महत्व प्राप्त झाले आहे. 

तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मुंबईतील वाळकेश्वर इथल्या बाणगंगा तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मलबार हिल परिसरातलं हे गोड्या पाण्याचं कुंड आहे. या तलावाचं ऐतिहासीक दृष्ट्या अधिक महत्व आहे. त्यामुळे राज्यसरकारच्या पर्यटन विभागाने ह्या तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.  वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड आणि ग्रँट रोड रेल्वेस्थानकांपासून अगदी जवळ आहे. मलबार हिलच्या एका छोटेखानी टेकडीवर वाळकेश्वर मंदिर परिसरात पाण्याचा तलाव आहे. हा तलाव  ‘बाणगंगा’ या नावाने ओळखला जातो. हा तलाव भूविज्ञान आणि स्थापत्यकलेचा एक उत्तम अविष्कार आहे. तलावाच्या चहुबाजूंनी बांधलेल्या दगडी पायऱ्या, भोवताली दिसणारे मंदिरांचे कळस. बाणगंगा परिसरात फिरताना वाराणसीच्या गंगा घाटावर फिरल्याचा फिल येतो. गेल्या अनेक वर्षांपासून येथे दीपोत्सवही मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. 

अशी आहे बाणगंगा तलावाची अख्यायिका

बाणगंगा परिसराबाबत पुराणात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. शिवलिंगाच्या पूजेसाठी पाणी हवे होते म्हणून प्रभू श्रीरामचंद्र यांनी याच ठिकाणी बाण मारला आणि तेव्हा गंगा अवतरली यामुळे हा परिसर बाणगंगा म्हणून ओळखला जातो अशी  एक अख्यायिका आहे. दुसरी अख्यायिका म्हणजे राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना समुद्राजवळच्या एका टेकडीवर आले. यावेळी सीतेला तहान लागली.  पिण्यासाठी पाणी कुठेच मिळेना. त्यावेळी रामाने समुद्रकाठच्या या वालुकामय जमिनीत एक बाण मारला आणि या जमिनीतून गोड्या पाण्याचा झरा फुटला असे सांगितले जाते. परशुरामाने बाण मारून इथून पाणी काढले होते असेही सांगितले जाते. 

Disclaimer - बाणगंगा तलाव आणि परिसराबाबत असलेल्या सर्व अख्यायिका या ऐकीव माहितीच्या आधारावर आहेत. Zee 24 Taas याची पुष्टी करत नाही.