डोंबिवली : भाजप नगरसेविकेने पालिका आयुक्तांवर बांगड्या फेकल्या. विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असणारी कल्याण डोंबिवली महापालिका आज पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने संतप्त भाजप नगरसेविकेने पालिका आयुक्तांवर बांगड्या फेकल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.नगरसेविका प्रमिला श्रीकर चौधरी यांनी बांगड्या फेकून आपला राग व्यक्त केला आहे. त्यांच्या प्रभागात होत असणाऱ्या अनधिकृत बांधकामाबाबत त्यांनी नगररचना विभागाकडे सतत तक्रार केली होती. मात्र दोन वर्षे सतत पाठपुरावा करूनही नगररचना विभाग आपल्या तक्रारींवर कारवाई करत नसल्याने आजच्या महासभेत त्यांनी याप्रकरणी सभा तहकुबी मांडली होती. त्यावर तासभर चर्चा होऊनही आयुक्त याप्रकरणी कोणतीही ठोस भूमिका जाहीर करत नसल्याचे सांगत भाजप नगरसेविका चौधरी आणखीनच संतप्त झाल्या.
त्यांनी आपली जागा सोडून थेट नगररचना अधिकाऱ्यांसमोर जात आपल्या हातातील बांगड्या त्यांच्यासमोर टेबलावर आदळल्या. यानंतर थेट महापालिका आयुक्तांच्या टेबलसमोर येऊन त्यांनी हातातून आणखी बांगड्या काढल्या आणि पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यावर भिरकावल्या. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि पिठासीन अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली.
दरम्यान चौधरी यांनी आपल्या हातातील बांगड्या टेबलावर आदळल्यानंतर नगररचना विभागाचे अधिकारी निर्लज्जपणे हसत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून आहे. महापालिका अधिकारी लोकप्रतिनिधींबाबत जर इतके उदासिन असतील, त्यांना काडीचीही किंमत देत नसतील तर तिकडे सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.