सांगलीत धक्कादायक प्रकार, वसतिगृहातील मुलींचा विनयभंग

पसायदान मुलींच्या वसतिगृहातील मुलींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.  

Updated: Feb 20, 2019, 07:02 PM IST
सांगलीत धक्कादायक प्रकार, वसतिगृहातील मुलींचा विनयभंग title=

सांगली : शहरातील पसायदान मुलींच्या वसतिगृहातील मुलींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एका पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन, चार जणांना अटक करण्यात आली आहे. कर्नाळ रस्त्यावरच्या पसायदान मुलींच्या वसतिगृहातील चार मुलींचा विनयभंग झाला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी वाहन चालक संजय किणीकर, मुख्याध्यापक अप्पासाहेब करांडे, संस्थाचालक नंदकुमार अंगडी आणि स्वयंपाकीण वर्षाराणी संजय किणीकर या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुलीला धमकावले

संजय किणीकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. तर इतर तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. वसतिगृहातील मुलींच्या खोलीच्या दरवाजाची कडी लागत नाही. रात्रीच्या वेळी संजय किणीकर तिथे अर्धनग्न अवस्थेत फिरायचा. चार महिन्यांपूर्वी संजय किणीकर पीडित मुलीकडे एकटक पाहत थांबला होता. त्यानंतर काही दिवसांनी संजय किणीकरने पीडित मुलीला गाठले. तिथे त्याने एका मुलीला दम देऊन तिचा विनयभंग केला. पीडितेने त्याच्यापासून कशीबशी सुटका करुन घेतली. पीडितेने दुसर्‍या दिवशी हा प्रकार इतर मुलींना सांगितला. त्यावेळी हा प्रकार पुढे आला. तसेच हा प्रकार सांगितल्यानंतर संजय किणीकरने आपल्याशीही असाच प्रकार केल्याचे इतर मुलींनी सांगितले. त्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. 

काही दिवसांपूर्वी पीडित मुलींचे पालक मुलींना भेटायला आले असता, मुलींनी घडला प्रकार त्यांच्या कानांवर घातला. त्यानंतर पोलीस तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. मुलींना निर्भय वातावरणात शिकायला मिळणे नितांत गरजेचे आहे. तशी परिस्थिती निर्माण करुन देणे ही प्रशासन आणि सरकारची जबाबदारी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.