सातारा : Satara District Central Co-operative Bank Election : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले ज्ञानदेव रांजणे विजयी झाले. पराभवानंतर शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde) यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, माझ्या पराभवामागे मोठं कारस्थान रचण्यात आले. मला राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मदत केली पण जिल्ह्यातील नेत्यांनी मला पाडणे हे ठरवून केलेले एक षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ( Bank Election News)
आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिलगिरी मागत माफी मागितली. राष्ट्रवादी पक्षामुळे माझी ओळख आहे. मला राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मदत केली पण जिल्ह्यातील नेत्यांनी मला पाडणे हे ठरवून केलेले एक षडयंत्र आहे. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, हे शरद पवार यांना माहीत आहे. पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माझं नाव निश्चित झालं होतं. मतदारांचा आकडाही मी समोर ठेवला होता. राजराजे निंबाळकर हे देखील या बैठकीला होते. त्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले. पण ते किती प्रामाणिक होते माहीत नाही, माझ्या पराभवामागे मोठे कारस्थान आहे. येत्या काळात ते समोर येईल, असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याचे वृत्त पसरताच त्यांचे समर्थक आक्रमक झालेत. त्यांनी साताऱ्यात राडा घालत राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले. शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यालय फोडल्याचे वृत्त परसरताच पोलिसांनी कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. साताऱ्यात शिंदेना पराभव लागला जिव्हारी लागल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे. या जिल्हा बँक निवडणुकीत अनेक दिग्गजांना निवडणूकीत धक्का बसला.
जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात मोठी राडेबाजी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. ज्ञानदेव रांजणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक केली. ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावरही राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा फोटो आहे. याच कार्यालयावर शशिकांत शिंदे यांच्या कार्याकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर साताऱ्यात तणाव पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी कार्यालयाच्या तोडफोडीनंतर विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांची जोरदार टीका. शशिकांत शिंदेंना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.