हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : देशात सध्या कांद्याने चांगलाच भाव खाल्ला असून प्रतिकिलो कांद्याच्या बाजार भावाने डबल सेंचुरी पार केली आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील लागवड झालेल्या कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा पिक धोक्यात आलं आहे.
मोठ्या भांडवली खर्चातून लागवड केलेला हा कांदा परतीच्या पावसाच्या संकटातून सुटून आता वातावरणातील बदलामुळे करपा रोगाच्या संकटात सापडला आहे. सकाळी पडणारं धुकं, दवं यामुळे कांद्यावर करप्याचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
सध्या सर्वत्र कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारभाव गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी असून शेतकऱ्यांना या बाजार भावाचा फायदाच होत नसून हा फायदा केवळ व्यापारी वर्गालाच होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. पाच ते सहा रुपये किलोने विकलेला कांदाच आता दिडशे ते दोनशे रुपये किलोने विकत घेण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.
मागील वर्षी याच काळामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला पाच ते सहा रुपये किलो बाजार भाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांना मागील काही वर्षामध्ये लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी वखारीत साठवलेला कांदा लवकरच बाजारात विकला. तर सध्याची कांद्याची साठवणूक ही व्यापाऱ्यांकडे जास्त प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांनाच आता आपला कांदा अधिक भावात विकत घ्यावा लागतो आहे.
शेतात नवीन लावलेला कांदादेखील परतीच्या पाऊसाने मोठ्या प्रमाणात खराब झाला. तर आता सुरु असलेल्या सततच्या ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पातींवर करपा आणि गाभ्यामध्ये मव्यासारख्या आजाराचा प्रादुर्भाव होत असल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. एकीकडे कांद्याने शहरी भागातील सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले असले तरी कांद्याचे बाजार भाव वाढूनही सर्वसामान्य बळीराजाच्या पदरी मात्र निराशाच आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कष्टकरी बळीराजाची चिंता मात्र आता वाढली आहेत.