मुंबई : प्रेमविवाह केला म्हणून बहिणीच्याच पतीची हत्या करणाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुधवारी बीडमध्ये घडलेल्या या हादरवून टाकणाऱ्या घटनेच्या तपासात पाच दिवसांनंतर पोलिसांना यश आलं. अमरावतीहून बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासोबत इतरही चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सुमित वाघमारे हत्याकांड प्रकरणाने साऱ्या महाराष्ट्राला हादरा बसला होता. ज्यानंतर आरोपींनी पळ काढण्यात यश मिळवलं होतं. पण, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना दिवसांपूर्वी यश मिळालं होतं. आरोपींनी हत्येसाठी वापरलेली गाडी बीड शहराच्या उत्तरेला असलेल्या नवीन मोंढा भागातील बायपास रोडवर बेवारस पोलिसांना आढळली. याच गाडीतून आरोपी बालाजी लांडगे आपल्या मित्रांसह आला आणि सुमीत वाघमारेची हत्या करून पसार झाल्याचं म्हटलं गेलं होतं.
तपासादरम्यान हाती लागलेल्या या पुराव्याच्या मदतीनेच पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. ज्यामध्ये बालाजी आणि संकेत या दोघांचेही फोन, कॉल रेकॉर्ड या साऱ्याच्या बळावर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
दरम्यान, प्रेमविवाह केला म्हणून बहिणीच्या पतीचा भर रस्त्यात दिवसाढवळ्या मेहुण्याने खून केला. मात्र प्रकरण एवढ्यावर संपत नाही. पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच हे हत्याकांड घडल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर बीडमध्ये सैराटचं अनुकरण घडलं नसतं, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनीच दिली होती. बेदरकार पोलीस, हेकेखोर नातेवाईक आणि मुजोर राजकारण्यांच्या घाणेरड्या वृत्तीने सुमितचा बळी घेतल्याची प्रतिक्रिया समोर आली होती.