लॉकडाऊनमध्ये अनेक व्हाईट कॉलर व तरुण सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात, सोशल मीडियापासून सावधान

 सुंदर ललनांकडून शहरातील अनेक व्हाईट कॉलर व तरुणांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्यात आले आहे.

Updated: Jun 1, 2021, 10:14 PM IST
लॉकडाऊनमध्ये अनेक व्हाईट कॉलर व तरुण सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात, सोशल मीडियापासून सावधान title=

अमर काणे, नागपूर : नागपुरात लॉकडाऊनच्या काळात सेक्सटॉर्शन प्रकार वाढलेय. सुंदर ललनांकडून शहरातील अनेक व्हाईट कॉलर व तरुणांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्यात आले आहे. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीचे अश्लील चाळे चित्रित करण्यात येतात. त्यानंतर संबंधित फसवणूक करण्यात आलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देवून खंडणी वसूलीचा नवा गोरखधंदा सध्या जोमात सुरु झालाय. अशाप्रकारच्या अनेक तक्रारी नागपूर सायबर क्राईमला मिळाल्या आहेत. तर काही जणांनी बदनामीच्या भीतीनं समोर आले नाही.

सेक्सटॉर्शन हे ब्लॅकमेलिंगचा नवा मार्ग गुन्हेगारांनी शोधला. लॉकडाऊनच्या कालावधीत सुंदर ललनांच्या अमीषाला बळी पडत अनेक जणांचं  सेक्सटॉर्शन झाले आहे. अनेक आंबटशौकीन इंटरनेटवर विविध डेटिंग साईट्सला भेटी देतात. डेटिंग साईटवरील तरुणी त्यांना अगदी अलगद मोहपाशात अडकवतात. सुरुवातीला व्हिडीओ कॉलवर प्रेमाने मधाळ वाणीनं गप्पा मारल्या आणि एक दोन व्हिडीओ कॉल नंतर या आंबटशौकिनांना त्यांच्या आवडीप्रमाणे उद्युक्त करत व्हिडीओ कॉलवर अश्लील चाळे करायला लावतात.

काहींजण या तरुणींच्या मोहपाशात आपल्या मर्यादा ही ओलांडूनन टाकतात.मग काय शिकार फसलं की मग खेळ सुरु होतो. व्हिडिओ कॉलवर समोरील व्यक्तीकडून अपेक्षित कृती झाल्यानंतर काही मिनिटानंतर त्या तरुणीचा मेसेज येतो. आणि मग हा ब्लॅकमेलिंग सुरु होते. व्हिडिओ कॉल वर केलेले अश्लील चाळे रिकॉर्ड झाले असून ते सर्व फेसबुकसह सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्म्स वर वायरल करण्याची धमकी दिली जाते.

पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केल्यानंतर तो व्हिडीओ कुटुंबापर्यंत सर्व मित्रांपर्यंत पोहोचवण्याची धमकी दिली जाते, धक्कादायक म्हणजे डेटिंग साइट्सच्या नावावर चालणाऱ्या या खंडणी वसुलीच्या जाळ्यात अडकणारे समाजातील पांढरपेशे वर्गातले आणि तरुण वर्गातले अधिक आहे. गेल्या काही महिन्यात सेक्सटॉर्शनच्या अनेक तक्रारी आल्याचं नागपूर सायबर क्राईमचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक बागुल यांनी सांगितलं. 

अशा प्रकरणात बचावाच्या दृष्टीनं सोशल मीडियाचा वापर अतिशय सावधतेने आणि काळजीपूर्वक करावा, तसेच सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट न स्विकारण्यासही त्यांनी सांगितलं.अनेक जण अशा प्रकरणात बदनामीमुळं तक्रार देण्यास पुढे येत नाही वा बहुतांशी लोकं पैसे देऊन सुटका करू पाहतात. मात्र, एकदा पैसे दिल्यानंतर आणखी मागणी सुरु होते. आणि अखेरीस या चक्रव्युहात तो व्यक्ती अडकत जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आता पर्यंत विविध पेमेंट गेटवेच्या नावाखाली आर्थिक गुन्हे होत होते. मात्र सायबर गुन्हेगारांनी त्यांचा मोर्चा आंबटशौकिनांकडे वळविल्याच गेल्या काही महिन्यातील अशा प्रकारच्या वाढलेल्या तक्रारीवरून समोर येतंय. नागपूर पोलिसांकडेच गेल्या काही आठवड्यात अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. पीडितांपैकी अनेक लोकं तर फसवणूक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे लोकांनी डेटिंग साईट्सचा मोह सोडला. अनोळखी लोकांचे फोन, मेसेज टाळले तर  अशी फसवणूक टाळता येवू शकते.