व्हॉट्सऍपवर लग्नाची पत्रिका आली असेल तर सावधान! आयुष्यभरासाठी होईल पश्चाताप

ऑनलाईन पत्रिकेच्या माध्यमातून लुटीचा व्हायरस मोबाईलमध्ये घुसवून अनेकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्यात आला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 9, 2024, 08:42 PM IST
व्हॉट्सऍपवर लग्नाची पत्रिका आली असेल तर सावधान! आयुष्यभरासाठी होईल पश्चाताप title=

लग्नपत्रिका व्हॉट्सऍपवर पाठवण्याची पद्धत आता रुढ झालीय. पण अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन आलेली लग्नपत्रिका तुमच्या लुटीचं कारण होऊ शकते... व्हॉट्सऍपवरुन लग्नाची पत्रिका पाठवून ऑनलाईन लूट करण्याचे प्रकार वाढलेत. ऑनलाईन पत्रिकेच्या माध्यमातून लुटीचा व्हायरस मोबाईलमध्ये घुसवून अनेकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारला आहे.

-व्हॉट्सअॅपवर लग्नाची पत्रिका आलीये, सावधान
-लग्नाची पत्रिका नव्हे लुटीची पत्रिका
-व्हॉट्सअॅपवरील लग्नपत्रिकेत लुटीचा व्हायरस

लग्नाचा सीझन सुरु झाला आहे.  लग्नाची पत्रिका व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर पाठवण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. लग्नपत्रिका पाठवण्याचा हाच सोपा मार्ग समजला जातो. पण लग्नाची हीच पत्रिका आता लुटीचं माध्यम झाली आहे. आतापर्यंत बँकेतून बोलतोय किंवा तुमचं बँक खातं बंद होईल अशी भीती दाखवून तुमच्या बँक खात्यांची माहिती मिळवली जात होती. पण आता सायबर भामट्यांनी लुटीसाठी नवी क्लुप्ती शोधून काढलीय.चक्क लग्नाची APKफाईल पाठवून मोबाईलधारकांच्या लुटीचा फंडा सुरु केला आहे.

- सायबर भामटे अनोळखी नंबरवरुन तुम्हाला डिजीटल लग्नपत्रिका पाठवतात
- ही लग्नपत्रिका APK फॉरमॅटमध्ये असते
- उत्सुकतेपोटी आलेली लग्नपत्रिका आपण कोणत्याही खात्रीशिवाय उघडतो
- लग्नपत्रिकेच्या नावाखाली आलेला व्हायरस आपल्या मोबाईलमध्ये शिरतो

एकदा का मोबाईलमध्ये लग्नाची एपीके फाईल उघडली की व्हायरस आपलं काम करण्यास सुरु करतोय.लग्नपत्रिका उघडल्यावर अगदी काहीवेळात आपला मोबाईल बंद पडतो. आपण जेव्हा फोन पुन्हा सुरु करतो तोपर्यंत मोबाईलमधील सगळ्या सेटिंग्ज बिघडलेल्या असतात.

- सायबर दरोडेखोर तुमची मॅसेजिंग सिस्टिम हॅक करतात
- तुमच्या गुगल पे, फोन पे या पेमेंट अॅपचाही ताबा घेतात
- इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचे पासवर्ड मिळवले जातात
- फोटो गॅलरीतले फोटोही सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जातात
- काही घटनांमध्ये मोबाईलमध्ये सेव्ह केलेल्या आधार कार्ड पॅनकार्डचाही गैरवापर केला जातो

सायबर गुन्हेगार तुमच्या बँक खात्यातल्या काही रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतात. तुमचं बँक अकाऊंट रिकामं केलं जातंच शिवाय तुमच्या गुगल पे आणि फोन पे वरुन ऑनलाईन खरेदीही केली जाते. ऑनलाईन क्रेडिट कार्डाचा वापर परदेशात खरेदी करण्यासाठी वापरला जातो. याचा तुम्हाला पत्ताही लागत नाही. कारण खरेदीचे अलर्ट देणारी मॅसेजिंग यंत्रणाही त्यांनी ताब्यात घेतलेली असते. एका लग्नाच्या पत्रिकेनं तुम्हाला कंगाल केलेलं असतं

एकट्या नागपुरात अशा सायबर लुटीच्या अनेक घटना समोर आल्यात. त्यामुळं अजाणतेपणी अशी लग्नपत्रिका उघडल्यास तातडीनं जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा किंवा 1930 या सायबर गुन्ह्यांसंदर्भातल्या तक्रारींसाठीच्या सायबर हेल्पलाईनला कॉल करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय.

मोबाईलवर अनोळखी नंबरवरुन आलेली लग्नपत्रिका उघडू नका. एपीके फॉरमॅटमधील फाईल उघडण्याचा विचारच करु नका. एखाद्या मित्राची नातेवाईकाच्या नावे लग्नपत्रिका आल्यास पहिल्यांदा फोन करुन खात्री करुन घ्या. अन्यथा मित्र आणि नातेवाईकाच्या लग्नाच्या आनंदात तुम्ही कंगाल व्हाल... त्यामुळं राहा सावधान,