ऑनलाईन दारुविक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा फंडा

लॉकडाऊनचा गैरफायदा उठवण्याचा भामट्यांचा प्रयत्न

Updated: Apr 21, 2020, 05:33 PM IST
ऑनलाईन दारुविक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा फंडा title=
प्रतिकात्मक फोटो

विशाल करोळे, औरंगाबाद :  लॉकडाऊनमध्ये दारुविक्री बंद असल्याने दारु शौकीन आणि तळीरामांची तडफड सुरु आहे. त्याचा फायदा घेऊन ऑनलाईन दारुविक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा फंडा भामट्यांनी सुरु केला आहे. अशा भामट्यांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

लॉकडाऊनमुळे नेहमी दारुचं व्यसन असलेल्या लोकांची तडफड सुरु आहे. काही जणांची तर दुकानं फोडण्यापर्यंत मजल गेली आहे. फारच व्यसनी असेल तर तो दारु मिळवण्यासाठी काहीही करू शकतो. त्याचाच फायदा काही भामटे घेत आहेत. त्यांनी फेसबुकवर ‘दारुची ऑनलाईन विक्री आणि होम डिलिव्हरी’ असे पेजेस तयार केले आहेत. तुम्ही पत्ता दिला की ते दारू घरपोच देणार असा दावा केलेला आहे. धक्कादायक म्हणजे या पेजवर त्यांनी फोन नंबरही दिले आहेत. त्यावर फोन केला की तुम्हाला कोणती दारू हवी आहे, ती किती रुपयांना मिळेल हे सांगितले जाते. मात्र पैसे आधी ऑनलाईन ट्रान्फर करा अशी त्यांची अट आहे.

फेसबुकवरील जाहिरातील दिलेल्या नंबरवर फोन लावल्यास सुरुवातील तुम्हाला कोणत्या ब्रँण्डची दारु हवी, तुम्हाला किती रुपयांना मिळते, कुठे पाठवायची आहे अशी माहिती समोरून विचारली जाते. आणि त्यानंतर तुम्हाला थोडे जास्त पैसे द्यावे लागतील असे सांगितले जाते. नंतर एकच अट असते तुम्ही पैसे ऑनलाईन ट्रान्फर करा. त्यासाठी तुम्हाला नंबर पाठवतो, असेही समोरून सांगितले जाते. पैसे स्ट्रान्स्फर झाले की ४० मिनिटांत दारु घरपोच मिळेल असं फोनवरून सांगितलं जातं.

जाहिरातीत दिलेल्या फोनवर बोलल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे समोरची व्यक्ती आधी पैसे टाका, मग दारु पाठवतो असं सांगते. म्हणजे एखाद्याने पैसे भरले की त्याची फसवणूक होणार हे स्पष्ट आहे. दारुसाठी रोज अनेक लोक या ऑनलाईन जाळ्यात फसत असतील. त्यातही लॉकडाऊनमुळे दारुविक्री बंद असताना दारु मागवणं गैर. पुन्हा दारुमुळे फसवणूक झाली तर कुणाला सांगायचीही पंचाईत. त्यामुळे फसवणूक झालेल्याची अवस्था तोंड दाबून बुक्याचा मार अशी होत असणार. त्यामुळे फसवणुकीची प्रकरणं पुढे येणार नाहीत हे लक्षात घेऊन त्याचा फायदा हे भामटे उठवत आहेत.

 

अशा जाहिरातींपासून सावध राहावे असं आवाहन पोलिसांनीही केले आहे. या जाहिराती फसव्या आहेत. त्यात तथ्य नाही, असं औरंगाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे यांनी म्हटले आहे.