मुंबई : पुण्यातील भीमा कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी पाहायला मिळालेत. आंदोलकांनी एसटीला टार्गेट करत मोठे नुकसान केले. आतापर्यंत १२ एसटीची तोडफोड केली. तसेच अनेक ठिकाणी गाड्या जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी दगडफेकीचे प्रकारही झालेत.
बुलडाण्यातही भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद पाहायला मिळाले. बुलडाण्याकडे येणाऱ्या एसटी बसवर काही अज्ञातांनी दगडफेक केल्यानं काचा फुटल्या. मात्र सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. तसंच शहरातील अनेक दुकानांवरही दगडफेकही करण्यात आली. परिस्थिती पाहता पोलिसांनी वेळीच तत्पर भूमिका घेऊन क्विक रिस्पॉन्स टीम सोबत बंदोबस्त लावून सर्व काही नियंत्रणात आणले. जिल्ह्यातील खामगाव, मलकापूर, मेहकर, चिखली मधेही किरकोळ तोडफोड झाली.
जळगावात हिंसक जमावाकडून दोन एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. चोपडा जळगाव बसचालकावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या बसची शिवकॉलनीजवळ तोडफोड करण्यात आली तर असोदा-भादली बसचीही जमावाने तोडफोड केली, या हल्ल्यात बसमधील तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झालेत. हल्ला करून दहा ते पंधरा जणांचा जमाव घटनास्थळातून फरार झाला.
मुंबईत तीव्र पडसाद उमटले आहे. गेल्या आठ तासांपासून इस्टर्न एक्स्प्रेसवर रास्ता रोको सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमामधल्या हिंसाचाराप्रकरणी ठोस कारवाईचं आश्वासन दिल्याशिवाय रास्तारोको मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतलीय. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झालीय.
घाटकोपरपासून विक्रोळीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. त्यामुळे वाहतूक शाखेनं सर्व्हिस रोडवरुन वाहतूक आता नुकतीच सुरु केली आहे. त्यामुळं वाहतुकीची कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच मुलुंड, विक्रोळी, घाटकोपरमध्येही रास्तारोको करण्यात आल्याय. त्यामुळं या भागातही वाहतुकीची कोंडी झालीय.
आंदोलकांच्या रेल रोकोमुळं ठप्प झालेली हार्बर मार्गावरची लोकल वाहतूक आता सुरू झालीय. चेंबूरजवळ रेल रोको करण्यात आल्यां तब्बल तीन तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळं मुंबईकडं येणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. आता हार्बर रेल्वेसेवा सुरळीत सुरू झालीय.
भीमा कोरेगाव इथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यात कॅडबरी कंपनी परिसरात आंदोलन करण्यात आलं. आनंदनगर चेकनाका इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाचे अध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या घटनेमुळे काही वेळ मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.