पिंपरी चिंचवड : पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदरासंघातील भाजपचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. महेश लांडगे यांना आज बिर्ला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या काळात आमदार महेश लांडगे यांचा अनेकांशी संपर्क आला. तसेच शहरात येणाऱ्या बड्या नेत्यांशी देखील त्यांचा संपर्क आला. या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी स्वतः त्यांच्या मतदारसंघात जाऊन अनेकदा परिस्थितीचा आढावा घेतला होता. तसेच, गेल्याच आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी आमदार महेश लांडगे देखील तिथे उपस्थित होते.
रविवारी लांडगे यांची प्रकृती थोडी बिघडली. यानंतर त्यांचे स्वॅब टेस्टिंग करण्यात आलं. त्याचा रिपोर्ट आज सकाळी आला ज्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. महेश लांडगे यांच्या संपर्कात आलेल्यांचा देखील तपशील घेतला जात आहे.
या अगोदर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि आता भाजपचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली आहे.