Darshana Pawar Murder Case : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारच्या हत्येनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आठ दिवस बेपत्ता असलेल्या दर्शनाचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर दर्शनाचा खुनी राहुल हांडोरे याला अटक केली आहे. राहुल हांडोरे मुंबईहून पुण्याला जात असताना त्याला अटक करण्यात आली. पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
"या गुन्ह्याच्या मुख्य आरोपी राहुल हांडोरे असल्याचे समोर आले होते. बुधवारी रात्री त्याला अंधेरी रेल्वे स्टेशन येथून अटक केली आहे. आरोपी राहुलने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला न्यायालायासमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासात दर्शनाने लग्नास नकार दिल्याने त्यामुळे राहुलने हत्या केली. दोघांची लहानपणापासून ओळख आहे. राहुलला दर्शनासोबत लग्न करायचे होते. दर्शनाने नकार दिला म्हणून राहुलने गुन्हा केला अशी प्राथमिक माहिती आहे. सखोल तपासात आणखी माहिती समोर येऊ शकते. आरोपी सुद्धा एमपीएससीची तयारी करत होता. पुण्यात पार्टटाईम जॉब करुन तो अभ्यास करत होता. सध्या तो फूड डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत होता. मुलीच्या मामाचे घर आणि आरोपीचे घर समोरासमोर असल्याने लहानपणीपासून यांची ओळख आहे. त्यांच्यात प्रेमप्रकरण होतं की नाही हे सखोल तपासातच समोर येईल," असे पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.
"दर्शना आणि राहुल दोघेही नातेवाई नव्हते. लग्नाला दर्शनाने नकार दिला होता. आरोपी राहुल हा ट्रेनने फिरत होता. आम्हाला याचे लोकेशनसुद्धा कळत होते. आमच्या माहितीप्रमाणे हा पश्चिम बंगालपर्यंत गेला होता. त्यानंतर हा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्याला अंधेरी रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली आहे. कदाचित अंधेरी रेल्वे स्थानकावरुन दुसरीकडे पळून जाण्याच्या तो विचारात होता. घरच्या काही लोकांसोबत अधूनमधून त्याने संपर्क साधला होता," असेही पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले.
"घटनास्थळावरुन रक्ताने माखलेले काही दगड सापडले आहेत. शवविच्छेदन अहवालातसुद्धा दर्शनाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले आहे. त्याने हत्येची तयारी आधीपासून केली होती का? त्याने शस्त्र सोबत नेले होते का याची माहिती सखोल तपासानंतरच समोर येईल. त्याची मानसिक परिस्थिती त्यावेळी काय होती याचाही तपास केला जाईल. सकाळी साडेआठच्या दरम्यान हे दोघेही किल्ल्यावर गेले होते. परत येताना राहुल एकटाच आला होता. राहुल हांडोरे पावणे अकराच्या सुमारास खाली आला होता," असे अंकित गोयल म्हणाले.