टोइंग वाहनावरील वसुलीबाज कर्मचाऱ्यांवर कारवाई? विशेष शाखेकडून चौकशी सुरू

असंख्य तक्रारीनंतर वाहतूक शाखेची टोइंग वाहनातून होणारी वाहने उचलण्याची कारवाई थांबविल्यानंतर आता टोइंग वाहनावरील खासगी कर्मचाऱ्यांची विशेष शाखेकडून चौकशी सुरू करण्यात अली आहे

Updated: Jun 16, 2022, 10:07 AM IST
टोइंग वाहनावरील वसुलीबाज कर्मचाऱ्यांवर कारवाई? विशेष शाखेकडून चौकशी सुरू title=

सागर आव्हाड, पुणे : असंख्य तक्रारीनंतर वाहतूक शाखेची टोइंग वाहनातून होणारी वाहने उचलण्याची कारवाई थांबविल्यानंतर आता टोइंग वाहनावरील खासगी कर्मचाऱ्यांची विशेष शाखेकडून चौकशी सुरू करण्यात अली आहे. यासाठी मागील तीन दिवसांपासून सकाळपासूनच त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयातील विशेष शाखेत हजेरीसाठी बोलवण्यात येत आहे. 

दंड वसुली तसेच टोइंग वाहनातून वाहने उचलण्यालाच प्राधान्य देणाऱ्या वाहतूक विभागामध्ये आता अतीवरिष्ठ अधिकाऱ्यानी लक्ष घातले आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी चौकात उभे राहून केवळ वाहतूक नियमनाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना सहपोलीस आयुक्तांनी केल्या आहेत. एवढेच नाही तर वाहतूक शाखेविरोधात आलेल्या गंभीर तक्रारींची चौकशी विशेष शाखेतील वरिष्ठांकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

 यानुसार आता  प्रत्यक्ष चौकशीला सुरवात करण्यात अली आहे. कामकाजात अनियमितता केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोइंग वाहनावरील खासगी कर्मचारी आणि संबंधित पोलीस कर्मचारी यांना विशेष शाखेत बोलवण्यात आले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून या कर्मचाऱ्यांकडून विशेष शाखेत हजेरी लावण्यात येत आहे. आता या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. 

... अन् चौकात पोलीस दिसू लागले

वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात असलेल्या पुणे शहरात नागरिकांना दररोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यातच शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून नियमनाऐवजी एका कोपऱ्यात थांबून दंडवसूलीला प्राधान्य दिले जात होते.

 मात्र, वरीष्ठ अधिकाऱ्यांनी अशी घोळका कारवाई बंद करण्याची सूचना केल्यानंतर आता मागील तीन चार दिवसांपासून चौकात वाहतूक पोलीस दिसत असल्याचे चित्र आहे.