नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी सिल्लेवाडा येथे 'भाजप चे झेंडे लावणाऱ्यांना घरात घुसून मारण्याच्या' धमकीनंतर आता भाजपनं त्यांचं आव्हान स्विकारलं आहे. भाजपनं सिल्लेवाडा गावात घरोघरी जाऊन भाजपचे झेंडे लावत केदांरांना प्रतिआव्हान दिलं आहे. आज सकाळीच सिल्लेवाडा गावात शेकडोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गोळा झाले होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार आणि आमदार गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात घराघरावर भाजपचे झेंडे लावले.
बस फेरी कार्यक्रमादरम्यान झालेल्या श्रेयवादाच्या लढाईवरून काँग्रेस आमदार सुनील केदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांच्यात हमरीतुमरी झाली होती. त्यानंतर आज भाजपने झेंडे लावण्याचे आंदोलन केलं.
जशी-जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. तसं राजकीय वातावरण तापत चाललं आहे. आमदार सुनिल केदार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसमधील वाद चांगलाच पेटला.
'जो कोणी भाजपचा झेंडा घेऊन फिरेल त्याला घरात घुसून मारू. असं केदार यांनी म्हटलं होतं. नागपुरातील एकमेव काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्याविरोधात भाजप कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता आहे. नागपूर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड मानला जातो.