दिसताक्षणी तोंडाला काळं फासा.. जितेंद्र आव्हाडांची जीभ कापून आणणाऱ्यास BJP कडून 10 लाखांचं बक्षीस

Jitendra Awhad : पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात नवा वाद उफाळून आलाय. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु असून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे

Updated: Feb 6, 2023, 01:33 PM IST
दिसताक्षणी तोंडाला काळं फासा.. जितेंद्र आव्हाडांची जीभ कापून आणणाऱ्यास BJP कडून 10 लाखांचं बक्षीस title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यात वादग्रस्त वक्तव केल्याचा प्रकार सातत्याने सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या राज्यपालांपासून (Governer bhagat singh koshyari) महत्त्वाच्या नेत्यांपर्यंतच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तवे केली आहेत. अशातच राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद उफाळून आलाय. 

शाहिस्तेखान, औरंगजेब आणि मुघल  होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यात काही ठिकाणी आंदोलने देखील करण्यात येत आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आव्हाड यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा भाजपतर्फे करण्यात आली आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपील दहेकर यांनी ही घोषणा केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या कथित वक्तव्यानंतर जालन्यात आव्हाड यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. भाजप कार्यालयासमोर आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यापुढे जिथे कुठे जितेंद्र आव्हाड असतील त्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा देत जो कोणी आव्हाड यांची जीभ कापेल त्याला दहा लाख रुपये बक्षिस देण्यात येईल अशी घोषणा भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केलीय.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्यावरुन हा वाद उफाळून आला आहे. "एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आले आहे. 1669 साली दुष्काळ होता तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते," असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.