नाशिक : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना पावन करुन पक्षात घेणं भारतीय जनता पक्षाला चांगलंच अडचणीचं ठरणार आहे. कारण नाशिकचा भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याला २० महिन्यांपूर्वी झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
भाजप आमदार बाळासाहेब सानप यांच्या माध्यमातून पक्षात दाखल झालेल्या आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या हेमंत शेट्टीच्या हातात मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याच्या एक दिवस आधीच पोलिसांच्या बेड्या पडल्यात
जुगार, मटका चालवण्यासह हेमंत शेट्टीवर सहा ते सात गुन्हे दाखल आहेत. तरीही त्याला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. 20 महिन्यांपूर्वी जालिंदर उर्फ ज्वल्या उगलमुगले या गुन्हेगारी पार्श्भूमीच्या तरुणाचा खून झाला होता. तर दहा बारा दिवसापूर्वी पंचवटीतल्या पाथरवट लेनमध्ये एका टोळक्यानं धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केली होती. त्यातल्या अटक केलेल्या आरोपींनी पोलीस चौकशीत २० महिन्यांपूर्वीच्या खुनाची कबुली दिली. त्यानुसार भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याच्या सांगण्यावरुनच ज्व्याल्याचा खून केल्याच पोलीस तपासात निष्पन्न झालेत.
1 ऑक्टोंबर 2015 पासून जालिंधर बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये केली होती. मात्र २० महिने त्याच काहीच तपास लागला नाही. अडीच वर्षांपूर्वी वर्चस्व वादातून शेट्टी आणि ज्वाल्या याची बाचाबाची झाली होती. या कारणातून ज्वाल्या याने शेट्टी याची गच्ची पकडली होती. याचाच राग शेट्टीच्या मनात असल्याने त्याने हत्या करण्यासाठी आरोपीना सांगितल्याची चर्चा आहे. मात्र या प्रकरणी पोलीस अधिकारी कँमेरा समोर बोलण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर येतायेत. त्या आधीच भाजप पदाधिकाऱ्यांच्या कारनाम्याने उघडकीस येतायेत.