भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बाप काढला !

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बाप काढला. पुण्यात ट्रॅक्टर रॅलीचासमारोप करताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.  

Updated: Oct 13, 2020, 08:06 AM IST
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बाप काढला !  title=

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बाप काढला. पुण्यात ट्रॅक्टर रॅलीचासमारोप करताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं, समितीच्या आवाराच्या बाहेर शेतमात विकणाऱ्यांकडून सेस गोळा करू, असा आदेश काढला. या निर्णयावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी, यांच्या बापाची पेंड आहे का? असा सवाल केला. याआधी अजित पवारांना उद्देशून त्यांनी आम्ही तुमचे बाप आहोत, असे वक्तव्य केले होते.

आम्ही पण तुमचे बाप आहोत - चंद्रकांत पाटील

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा ट्विट करून चंद्रकांत पाटलांवर टीका केली. वाचाळवीरांना उद्योग नसले की असे उपद्व्याप सूचत असतात. महाराष्ट्रविकासआघाडी सरकार काम करत असताना फक्त प्रसिद्धी मिळवण्याकरिता  बाप, माय असे शब्द वापरणारे कोल्हापूरकरांनी का नाकारले ते आता कळायला लागले. विकासाचा सूर्य उगवल्यामुळे "चंद्र" कायमचा मावळतीला जाणार, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

ट्रॅक्टर रॅलीचा समारोप सभेमध्ये झाला. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा विरोधकांचा बाप काढला. या विधेयकाला स्थगिती दिल्यावर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने लगेच फतवा काढला की बाजार समितीच्या बाहेर शेतमाल विकणाऱ्यांकडून आम्ही सेस गोळा करु  नाही म्हणून. अरे बापाची पेंड आहे की काय तुमच्या? कोणतरी स्थगिती देतं, कोणीतरी पत्र देते, शेतकरी राजाला हे कळत नाहीए का?, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. चंद्रकांत पाटील यांनी पुणे विषय समिती सभापती निवडणुकीच्यावेळी आम्ही तुमचे बाप आहेत, हे लक्षात ठेवा असे विधान केले होते.

पुणे  महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका. आम्ही पण तुमचे बाप आहोत, असे म्हटले होते. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून आम्ही तुमचे बाप आहोत असे म्हटले. पुणे महापालिकेच्या १६ प्रभाग सामित्यांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी ११ जागा या सत्ताधारी भाजपला मिळाल्या.