'आपण जर एक टक्का मतं वाढवली...', फडणवीसांनी सांगितलं विधानसभा जिंकण्याचं गणित, 'आभाळ कोसळलेलं...'

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) धक्का बसल्यानंतर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीत आपण क्लीन स्वीप करु असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 14, 2024, 06:52 PM IST
'आपण जर एक टक्का मतं वाढवली...', फडणवीसांनी सांगितलं विधानसभा जिंकण्याचं गणित, 'आभाळ कोसळलेलं...' title=

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) धक्का बसल्यानंतर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्यासाठी सरकारमधून मोकळं कऱण्याची विनंती करत आपण आता आगामी निवडणुकीसाठी किती गंभीर आहोत हे दाखवून दिलं होतं. दरम्यान भाजपा नेतृत्वाने विनंती अमान्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आता कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचं मनोबल वाढवत आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीत आपण क्लीन स्वीप करु असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यलयात झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना हे विधान केलं आहे. 

"फक्त विश्लेषण करून चालत नाही, रणनीती सुद्धा हवी, त्यासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण करावं लागतं," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच मुंबईच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतले आहे आणि विजयाचा नवीन संकल्प पाहायला मिळाला अशी कौतुकाही थापही दिली. 

"आभाळ कोसळलेले नाही. केवळ 2 लाख मतं राज्यात कमी असून मुंबईत तर 2 लाख मतं अधिक मिळाली आहेत.130 विधानसभा मतदारसंघात आपली आघाडी आहे. ध्रुवीकरण प्रचंड झाले आणि आपली संख्या कमी झाली. संविधान बदलणार हा नरेटिव्ह तयार करण्यात आला होता. पहिल्या तीन टप्प्यात तीव्रता अधिक असल्याने 24 पैकी केवळ 4 जागा मिळाल्या. नंतर आपण त्याला प्रतिवाद केला आणि पुढच्या 24 जागांपैकी 13 जागा मिळाल्या," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

"नरेटिव्ह खोडून काढा. काल परवा महाराष्ट्राला कमी निधी असा नरेटिव्ह आला. खरे तर आधी महाराष्ट्राला 5.1% टक्के निधी मिळायचा, आता 6.3% मिळतो. त्याच्या वाटपाचे निकष वित्त आयोग ठरवतं. वक्फ बोर्डाला 10 कोटी निधी असा नरेटिव्ह तयार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात फक्त 2 कोटी देण्यात आला आहे. BDD चाळीतील लॉटरी काढली नाही, असा नरेटिव्ह केला. ती 20 मे रोजीच होती. पण मतदान असल्याने पुढे ढकलली गेली. ती होणारच आहे. स्मार्ट मीटर लावणार असा नरेटिव्ह, प्रत्यक्षात असा निर्णय नाही," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

"मेरिटमध्ये येणाऱ्यांना थोडे मार्क कमी मिळाले तर चेहरे पाडतात आणि जे नापास होतात ते 2 मार्क अधिक मिळाले म्हणून हत्तीवरून साखर वाटतात. मनात किंतु-परंतु ठेवू नका. आपल्यात क्षमता आहे," अस देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं. तसंच आताची मतं कायम ठेवून 1 टक्का मतं वाढविली, तर विधानसभा आपण क्लीन स्वीप करू. आता कामाला लागा अशा सूचनाही त्यांनी केल्या.