भाजपमधील नाराजीबद्दल एकनाथ खडसे म्हणतात...

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Updated: Dec 10, 2019, 07:47 PM IST
भाजपमधील नाराजीबद्दल एकनाथ खडसे म्हणतात... title=

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या अनेक नेत्यांशी आमचे जवळचे संबंध आहेत. ४०-४५ वर्ष अनुभव असलेला कार्यकर्ता आपल्या पक्षात असावा अशी त्यांची इच्छा आहे. पण अद्याप मी त्याबद्दल काही निर्णय घेतला नसल्याचे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मी नाराज आहे ही बातमी चुकीची आहे. माझी मनधरणी करण्यासाठी मुनगंटीवार आणि तावडे आले असे नाही. नव्याने आलेले सरकार आणि आपले सरकार का आले नाही ? यावर आमची चर्चा झाल्याचे खडसे म्हणाले. 

जळगावच्या सिंचन प्रकल्पासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याचसाठी काल शरद पवार यांची भेट घेतली होती असे खडसे यांनी स्पष्ट केले. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

परळी वैजनाथ येथे पंकजा मुंडे यांनी स्वाभीमानी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मुंडे साहेब असल्यापासून आम्ही तिथे जात आहोत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबाद येथे पशु आणि वैद्यकीय विभागाची उभी राहवे यासाठी मी प्रयत्न केले. पण अद्याप ते उभे राहीले नाही. मागच्या कालखंडात ते स्मारक उभे राहीले नाही. आपण आपल्या कार्यकाळात ते स्मारक उभारावे अशी मागणी केली. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करण्यात येईल आणि त्या जागेला मी भेट देईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे खडसे म्हणाले. 

खडसे जेव्हा मंत्री होते तेव्हा गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याचे ठरले होते. पण फडणवीस सरकारमध्ये ते झाले नाही. त्यामुळे खडसे हे कबुली देत नसले तरी त्यांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिसतो आहे. त्यामुळे १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर हे नेते काय भूमिका मांडणार ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.