किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना राडा सुरूच, कोर्लई गावात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले

मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कथित बंगल्यांवरून शुक्रवारी जोरदार राडा झाला.   

Updated: Feb 18, 2022, 10:30 PM IST
किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना राडा सुरूच, कोर्लई गावात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले title=

मुंबई : मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या कथित बंगल्यांवरून शुक्रवारी जोरदार राडा झाला. भाजप नेते किरीट सोमय्या या बंगल्यांची पाहणी करण्यासाठी थेट रायगड जिल्ह्यातल्या कोर्लई (Korlai) गावात गेले. तेव्हा शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते एकमेकांना भिडले. कोर्लई गावात सोमय्या विरुद्ध शिवसेना सामना कसा रंगला, पाहूयात. (bjp leader kirit somaiya and shivsena chief minsiter uddhav thackeray wife rashmi thackeray controvery over to bunglow scam in korlai village in alibaug)

रायगड जिल्ह्यातल्या कोर्लई गावात शुक्रवारी जोरदार धुमशान रंगलं. सोमय्या विरुद्ध शिवसेना राडानाट्याचा नवा अंक इथं पाहायला मिळाला. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांच्या कथित 19 बंगल्यांची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या कोर्लई गावात पोहोचले. 

बंगल्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी ते ग्रामपंचायत कार्यालयात आले, तेव्हा तिथं आधीच उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईल स्वागत केलं. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर थेट दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हातापायीवर आले.

किरीट सोमय्या ग्रामपंचायत कार्यालयातून निघून गेल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी गोमुत्र शिंपडून कार्यालय शुद्ध केलं. कोर्लई गावात कोणतेही बंगले नाहीत. सोमय्यांना केवळ ड्रामेबाजी करायची होती, अशी टीका कोर्लईच्या सरपंचांनी केली आहे. तर बंगले गायब झाल्याबाबत चौकशी करावी, अशी तक्रार सोमय्यांनी रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केली. 

त्यानंतर सोमय्या यांनी थेट रायगड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंशी गद्दारी केली का, असा खोचक सवालही सोमय्यांनी केला.

कोर्लईच्या बंगल्यांचा नेमका वाद काय? 

कोर्लई गावात रश्मी ठाकरेंचे 19 बंगले आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला होता. आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्याकडून हे बंगले आणि जमीन खरेदी करण्यात आली होती. रश्मी ठाकरेंनी 2013 ते 2021 या काळात घरपट्टी भरली. प्रॉपर्टी टॅक्सही भरला. मनिषा वायकरांनीही प्रॉपर्टी टॅक्स भरला. बंगले नाहीत तर प्रॉपर्टी टॅक्स का भरला? असा सवाल सोमय्यांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजूला कोर्लई ग्रामपंचायतीनं सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. 

तर आता या वादात अन्वय नाईकांच्या आत्महत्येचाही मुद्दा उपस्थित झालाय. या जागेचे मूळ मालक अन्य नाईक यांना भाजपच्या लोकांच्या दबावामुळंच आत्महत्या करावी लागली, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय.

याआधी पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की केली होती. आता कोर्लई गावात सोमय्यांच्या भेटीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सोमय्या विरुद्ध शिवसेना सामना रंगला. हा संघर्ष आणखी किती टोकाला जाणार, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.