मुंबई : महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्र्यांविरोधात आरोपांची मालिका सुरु करणारे भाजप नेते किरीट सोमय्या हे उद्या म्हणजे 26 मार्चला दापोली दौऱ्यावर जाणार आहेत. परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचं दापोली तालुक्यातील मुरूड इथलं रिसॉर्ट बेकायदा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. उद्या सोमय्या या रिसॉर्टची पाहणी करणार आहेत.
किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावरुन कोकणात वातावरण तापलं आहे. याआधी अनेक वेळा शिवसेना विरुद्ध किरीट सोमय्या असा संघर्ष पाहिला मिळाला आहे. आता कोकणात किरीट सोमय्या आणि मविआ आमने सामने येण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि शिवसेनेचे प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या याना दापोलीतच रोखून धरणार असल्याचा इशारा दिला आहे.
दापोली शहरातच सोमय्या यांना 'वापस चले जाव', असे म्हणत त्यांना रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. किरीट सोमय्या हे कोकणात येऊन कोकणातल्या पर्यटन व्यवसायिकांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. ते व्यवसायिकांना घाबरवत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.
किरीट सोमय्या हे उद्या शक्तीप्रदर्शन करत दापोलीत मार्च काढणार आहेत. 100 गाड्यांचा ताफा घेऊन दापोली तालुक्यातील मुरुड इथल्या साई रिसॉर्टवर मार्च काढणार आहेत.
निलेश राणे यांचं प्रतिआव्हान
दरम्यान, किरीट सोमय्या यांचा उद्याचा दौरा हा यशस्वी होणारच. आम्हाला कोण रोखतो ते आम्ही पाहतोच असं प्रति आव्हान भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीला दिलं आहे. किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यावरून महाविकास आघाडीने त्यांना रोखण्याची भाषा केली होती. त्याला निलेश राणे यांनीही उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याचे अकरा नव्हे तर अकराशे प्रॉपर्टी बाहेर येतील असा टोलाही निलेश राणे यांनी लगावला आहे.