'बंगालमध्ये ममता ब्रँड अपयशी झाल्याने प्रशांत किशोरांची मदत'

 प्रशांत किशोर यांना पाचारण करून त्या नवीन ब्रँड आणत असल्याची टीका पश्चिम बंगालमधील भाजप नेते मुकुल रॉय यांनी केली. 

Updated: Jun 7, 2019, 07:55 PM IST
'बंगालमध्ये ममता ब्रँड अपयशी झाल्याने प्रशांत किशोरांची मदत' title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, नागपूर : पश्चिम बंगालमध्ये ममता ब्रँड अपयशी झाल्याने प्रशांत किशोर यांना पाचारण करून त्या नवीन ब्रँड आणत असल्याची टीका पश्चिम बंगालमधील भाजप नेते मुकुल रॉय यांनी केली. पश्चिम बंगाल मधील वातावरण भाजपमय असून आता ममता यांचे तृणूमुल सरकार चालणार नाही अशीही पुष्टी त्यांनी जोडली. स्थानिक निवडणुका आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीत प्रारंभी पासून तर निकालानंतरही खुनखराबा सुरू आहे. बूथ कॅप्चरिंगसारखे प्रकार अनेक ठिकाणी घडले, अन्यथा तृणूमुलसाठी निकाल आणखी धक्कादायक राहिले असते, असा दावा करत ममता या डाव्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन सभ्यताविरोधी कार्य करीत असल्याचा आरोप देखील रॉय यांनी केला. नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय वर्ष संघ शिक्षा शिबिर सुरू असताना त्यांची संघ भूमीत ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. 

संघ प्रचारकाच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वना देण्यासाठी ही भेट असल्याचे रॉय यांनी सांगितले. असे असले तरी यावेळी संघाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांची पश्चिम बंगालमधील आगामी रणनीती आणि निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे.

दोन तास चर्चा 

गुरुवारी ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर या दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. या बैठकीत प्रशांत किशोर हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेससाठी काम करणार असल्याचं निश्चित करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला एवढा फटका का बसला? भाजपाच्या जागा २ वरून १८ कशा निवडून आल्या? भाजपाला किती टक्के मतं मिळाली? बंगालमधली व्होट बँक डाव्यांवरून भाजपाकडे कशी वळाली? याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी प्रशांत किशोर यांची मदत घेतली होती. त्यानंतर त्यांना या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळालं. त्यांनी १७५ पैकी दीडशे जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली.