लोकसभा निवडणूक निकालानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. संभाजीनगरमध्येही मोठी खळबळ उडाली आहे, याचं कारण संभाजीनगरमधील भाजपाचे नाराज पदाधिकारी राजू शिंदेंनी (Raju Shinde) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान भागवत कराड, अतुल सावे, रावसाहेब दानवे, बागडेंकडून राजू शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. रविवारी ते ठाकरे गटात प्रवेश कऱण्याची शक्यता आहे.
संभाजीगरनमधील भाजपा नेते आणि माजी नगरसेवक राजू शिंदे (Raju Shinde) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरात ठिकठिकाणी त्यांच्या प्रवेशाचे मोठे बॅनरही लागले आहेत. पण भाजपा नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते. रावसाहेब दानवे यांनी आधी विमानतळावर झालेल्या बैठकीनंतर शहारातील भाजपाच्या एका कार्यकर्त्याच्या घरी राजू शिंदे यांची भेट घेतली होती.
राजू शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश कऱणार असल्याची घोषणा केल्यानंतर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनीही संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची भेट घेतली. त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन त्यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर निर्णय घ्यावा अशी विनंती केल्याचंही अतुल सावे यांनी सांगितलं. पण शहरात आधीपासून राजू शिंदे ठाकरे गटात प्रवेश कऱणार असल्याचे बॅनर लागले असून भाजपाचे प्रयत्न फोल ठरले आहेत.
राजू शिंदे यांनी आपली नाराजी जाहीर करताना सांगितलं आहे की, "कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जात नसेल आणि भाजपाचं काम असूनही दुय्यम वागणूक दिलं जात असेल तर आम्ही काय करायचं? ग्राऊंड लेव्हलवर काम न करणारे आम्हाला ज्ञान देत असतील आणि त्यांचं काम करुनही आमच्या पदाधिकाऱ्यांबद्दल आस्था नसेल तर आम्ही त्यांचं काम का करायचं? आम्ही त्यांचं ओझं का वाहायचं? तशी पक्षाबद्दल आमची कोणतीही नाराजी नाही".
आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही. महिनाभरात कळेल भाजपमधून किती लोक येतील असा दावाही दानवेंनी केला आहे. ते म्हणाले की, "शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करत नाही. पण कोणाला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करायचं असेल तर आम्ही थांबवू शकत नाही. शेवटी संघटना मोठी झाली पाहिजे. संघटनेत वेगवेगळ्या प्रकारची मंडळी आली पाहिजेत. त्यामुळे कोणी येत असेल तर त्याला सांभाळून घेण्यात शिवसेनेतला फार अडचण येणार नाही. यामुळे जर भाजपाचे काही लोक येत असतील तर त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जाईल".