'महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका'

खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही.

Updated: Aug 1, 2020, 12:33 PM IST
'महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका'

अहमदनगर: राज्यातील महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आहेत, अशी बोचरी टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली. ते शनिवारी सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलत होते. यावेळी राम शिंदे यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात तिघाडी सरकार आहे. याचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही, असे राम शिंदे यांनी म्हटले. 

'सत्ता गेल्यापासून फडणवीसांचे सर्व मुहूर्त चुकतायत'

तसेच हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे. प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते. मात्र या सरकारने अनुदान दिले नाही, असा आरोप राम शिंदे यांनी केला.

मात्र, काँग्रेसकडून भाजपचे हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. भाजपच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. राज्य सरकार चार महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करत आहे, असा दावा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. 

'भाजपकडून शेतकऱ्यांची दिशाभूल; आम्ही चार महिन्यांपासून दूध उत्पादकांना अनुदान देतोय'

तसेच दुधाच्या दराबाबत आंदोलन करण्याचा भाजपला अधिकार नाही. त्यांच्या काळात दूध अर्थव्यवस्था ढासळली. भाजपने दूध भुकटी न्यूझीलंडमधून आयात केल्यामुळे  दुधाचे भाव पडले होते. त्यामुळे आता भाजपने या मुद्द्यावरुन  आंदोलन करणे हास्यास्पद असल्याची टीकाही यावेळी थोरात यांनी केली.