Thane New Railway Station: मध्य रेल्वेवरुन दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ठाणे स्थानकात पिक अवर्सच्या वेळी तुडुंब गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी आणि ठाणे स्थानकातील भार हलका करण्यासाठी ठाणे ते मुलुंडदरम्यान एक नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. लवकरच हे स्थानक प्रवाशांसाठी खुले होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या स्थानकाला काय नाव द्यावे याची चर्चा होऊ लागली आहे. माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी रेल्वेस्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. (Mumbai Local News Update)
ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान नव्या रेल्वे स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे. या नव्या रेल्वे स्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील मूळ नाव श्रीस्थानक हेच दिले जावे आणि देशातील पहिले रेल्वेस्थानक असलेल्या ठाणे रेल्वेस्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन या स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले जावे, अशी मागणी विनय सहस्रबुद्धे यांनी केली आहे.
माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या विनंतीवरुन मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी ठाणे स्थानकाला भेट देत स्थानकातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. यावेळी विनय सहस्त्रबुद्धे यांनी आणखी काही मागण्या केल्या आहेत. ठाणे रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास, कल्याण-वाशी, ठाणे ते वाशीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे- वसई या लोकल सेवा सुरू कराव्यात, कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना अतिरिक्त, बिना आरक्षित डबा जोडण्यात यावा, अधिकाधिक मेल-एक्स्प्रेस गाड्यांना जाता-येता ठाणे येथे थांबा द्यावा, तसेच प्रत्येक फलाटावर सरकते जिने, स्थानकातील पूर्व-पश्चिम पुलांना जोडणारे उत्तर-दक्षिण पूल निर्माण करणे आणि स्वछतागृहांसकट सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहांची रचना आणि नियमित देखभाल, अशा महत्त्वाच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत.
ठाणे स्थानकातील गर्दीचा ताण कमी होण्यासाठी नवीन स्थानक उभारण्यात येणार आहे. ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान असलेल्या मनोरुग्ण रुग्णालयाच्या प्रस्तावित जागेवर नवे स्थानक उभारण्यात येण्याची घोषणा करण्यात आली. 2025 मध्ये मध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक कार्यरत होण्याची शक्यता आहे. मुंबई सीएसटी आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या आणि ठाण्याहून निघणाऱ्या लोकल नव्या स्थानकावरून सोडण्यात येणार आहेत.