मुंबई : विधानसभेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनामुळे पंढरपूर या विधानसभा मतदारसंघातील (Pandharpur Assembly constituency by-election) रिक्त झालेल्या विधानसभा सदस्यांच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर भाजपकडून निवडून आलेले नवनिर्वाचित विधानसभा सदस्य समाधान महादेव अवताडे (Samadhan Avtade) यांनी आज विधान भवनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Deputy Speaker Narhari Jirwal) यांचेकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास विधानसभेचे सदस्य आशिष शेलार, कॅप्ट. आर. तमिल सेल्वन, संजय केळकर, अनिल पाटील, बाळा भेगडे, राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक याचबरोबर विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत, उपसचिव शिवदर्शन साठ्ये व राजेश तारवी उपस्थित होते.
पंढरपूर, मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून दामाजी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष समाधान महादेव अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. आमदार प्रशांत परिचारक यांनी अवताडे यांच्या नावाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर ते पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला.
राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. दिवंगत आमदार भारत भालके यांचे ते सुपुत्र होत. पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र भाजपकडून समाधान आवताडे यांनी बाजी मारत हा किल्ला भाजपकडे आणला आहे.