कोरोनाची खोटी लस देणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक

कोरोना व्हायरसच्या नावाने खोटी औषधं, लस देणाऱ्यांवर विश्वास ठेऊ नका.

Updated: Mar 12, 2020, 06:21 PM IST
कोरोनाची खोटी लस देणाऱ्या बोगस डॉक्टरला अटक title=
संग्रहित फोटो

जालना : कोरोना व्हायरस (Corona Virus) देशातील १२ राज्यांमध्ये पसरला आहे. देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसची ७३ प्रकरणं समोर आली आहेत. चीन, अमेरिकासह जगातील ९० देशांमध्ये कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरात अनेक प्रयत्न सुरु आहेत. परंतु, जगात अद्याप या व्हायरसवर कोणताही ठोस उपाय किंवा कोणतंही ठोस औषध उपलब्ध नाही. यादरम्यान, कोरोना व्हायरसच्या नावाने गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

जालना जिल्ह्यातील तीन महिलांनी लोकांना, कोरोना व्हायरसवरील औषधांच्या नावाने लस देण्याचा प्रकार समोर आला आहे. या तीन महिलांपैकी एक महिला स्वत:ला डॉक्टर म्हणवत होती. तर इतर दोघींनी तिच्या सहाय्यक असल्याची बतावणी केली. या महिला जालना जिल्ह्यातील अंबड तहसिल येथील पिंपळगावात पोहचल्या होत्या. तेथे या महिलांनी कोरोना व्हायरसमुळे आधीच घाबरलेल्या लोकांना लस देण्यास सुरुवात केली. त्या बदल्यात या महिलांनी पैसेदेखील उकळले.

या प्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी तीनही महिलांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड येथे राहणाऱ्या या तीन महिलांना बुधवारी अटक करण्यात आली. या तीन महिला स्वत:ला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी म्हणवत होत्या. तीनही महिला पिंपळगावातील लोकांना भेटल्या आणि कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांना खोटी लसही दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील काही लोकांनी ग्रामीण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महादेव मुंडे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली. त्या महिलांकडून लस आणि बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या लस आणि बाटल्या राज्य आरोग्य विभागात पाठवण्यात आल्या आहेत. तीनही महिलांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, कोरोना व्हायरसवर बाजारात कोणत्याही प्रकारचं औषधं उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाच्या नावाने कोणी औषधं, लस देण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांबाबत प्रशासनाला त्वरित कळवा. कोरोनापासून बचावासाठी योग्य त्या उपायांची खबरदारी घ्या. याबाबत कोणतीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.