पुणे कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर... तात्काळ सुटकेचे आदेश

Pune Porcshe Accident : पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 

Updated: Jun 25, 2024, 03:31 PM IST
पुणे कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर... तात्काळ सुटकेचे आदेश title=

Pune Porcshe Accident : पुण्यातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Pune Car Accident) अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन (bail) मंजूर केला आहे. अल्पवयीन आरोपीच्या आत्याने कोर्टात याचिका केली होती. ही आटक बेकायदा असल्याचं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. अल्पवयीन आरोपीला पुण्यातील बालगृहात ठेवण्यात आलं होतं. अल्पवयीन आरोपीची आत्या पूजा जैन हिने कोर्टात हेबियस कॉर्पसअंतर्गत याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई हायकोर्टाने स्विकारली आहे. मुलाची तात्काळ सुटका करुन त्याला आत्या पूजा जैनच्या ताब्यात देण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. 

अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला तात्काळ जामीन मंजुर करण्यात आला होता. पण जामीन दिल्यानंतर आरोपीला पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही अटक बेकायदा असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. यावर अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून तात्काळ सुटका करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. मुलाचं समुपदेशन करण्याचं आदेशही देण्यात आले आहेत.

अल्पवयीन मुलाचे वडील, आजोबा तुरुंगात असल्याने मुलाच्या बाजूने याचिका कोण दाखल करणार असा प्रश्न उपस्थित करत याचिकाकर्ता पूजा जैन यांनी ही याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना अल्पवयीन आरोपीची तात्काळ सुटका करत त्याचा ताबा आत्या पूजा जैन यांच्याकडे देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

काय आहे नेमकी घटना?
19 मे 2023 रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात भीषण अपघात घडला. 17 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीने पोर्शे कारने मोटरसायकलवरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली. या अपघातात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुण तरुणीची नावं अश्विनी कोस्टा आणि अनीस अवधिया अशी होती. पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगाच ही अलिशान कार चालवत असल्याचे समोर आले होते. अपघातानंतर नागरिकांनी कार चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल. मात्र, अवघ्या 15 तासांतच आरोपीला जामीन मंजुर करण्यात आला. आरोपी अल्पवयीन असल्याने कोर्टाकडून जामीन मंजूर झाला. कोर्टाने आरोपीला या दुर्घटनेवर निबंध लिहिण्यास सांगितलं होतं. तसंच, 15 दिवस येरवडा ट्रॅफिक पोलिसांत स्वेच्छेने काम करण्याचे आदेश दिले होते.

आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार
धक्कादायक म्हणजे अपघात झाल्यानंत अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलची पुण्यातील ससून रुग्णालयात अदलाबदल करण्यात आली. डॉक्टर श्रीहरी हळनोरने ब्लड सॅम्पलची अदलाबदल केली. एक महिला आणि दोन प्रौढ व्यक्तींचे ब्लड सॅम्पल घेतले. ती महिला या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल होत्या का? शिवानी अग्रवाल यांच्या ब्लडचं सॅम्पल घेणार का? असा सवाल आता विचारला जातोय. 19 मे रोजी डॉक्टर श्रीहरी हळनोरने आरोपीचे ब्लड सॅम्पल घेतले होते. 4 अनोळखी व्यक्तींनी ससून रुग्णालयात प्रवेश केला. बाहेरुन आलेल्या या चौघांनी डॉक्टरवर दबाव टाकत सॅम्पल बदलल्याचा आरोप करण्यात येतोय. अजय तावरेनेही ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा जबाब डॉक्टर श्रीहरी हळनोर यानेही दिलाय.