पुण्यात आता पाच रुपयांत बसचा प्रवास

पुणे शहर बसमधून प्रवास करताना पुणेकरांना आता ५ रुपयांत प्रवास करता येणार आहे.  

Updated: Oct 24, 2020, 04:35 PM IST
पुण्यात आता पाच रुपयांत बसचा प्रवास

पुणे : शहर बसमधून प्रवास करताना पुणेकरांना आता ५ रुपयांत प्रवास करता येणार आहे. हा प्रवास पाच किलोमीटरपर्यंत असणार आहे. महत्वाचे म्हणजे दर पाच मिनिटाला ही बस उपलब्ध होणार आहे. या योजनेला 'अटल' म्हणजेच अलाइनिंग ट्रान्झिट ऑन ऑल लेन्स असे नाव देण्यात आले आहे. पुणेकर आता बसला प्राधान्य देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामुळे पीएमपीएलच्या (PMPL) उत्पनात वाढ होण्याची शक्यता आहे. आजपासून ही बससेवा सुरु झाली आहे.

मध्यवर्ती पुणे तसेच उपनगरांतील एकूण ४६ मार्गांवर अशा सुमारे ३५० मिडी बसेस धावणार आहेत. PMPL प्रवाशांची संख्या वाढवण्याबरोबरच त्यांना जलद सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजेनेमागे आहे. यातून pmpl च्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे. आज शनिवारी या अटल योजनेचे उदघाटन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएलच्या या योजनेमुळे सक्षम होणार असल्याचा विश्वास यानिमित्ताने व्यक्त होत आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांना याबाबत माहिती देताना सांगितले, प्रवास चांगला व्हावा आणि तो स्वस्त व्हावा याकडे भर देण्यात आला आहे. तर या बससेवेमुळे पुणेकरांना प्रवास करणे सुलभ होईल, असे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

या योजनेचे उद्घाटन आज झाले तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही योजना उद्यापासून म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर ती उपलब्ध होणार आहे.  येत्या काही दिवसांमध्ये या योजनेमध्ये आणखी बसेसचा समावेश केला जाईल, असेही राजेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले आहे. आता या योजनेनंतर तरी पुणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळतात का याची उत्सुकता आहे.