पुणे : OLX (ओएलएक्स) किंवा तत्सम संकेतस्थळावरच्या जाहिरातीच्या माध्यमातून एखादी वस्तू खरेदी करत असाल तर जरा सावधान. ऑनलाईन व्यवहारांमध्ये सध्या एअरपोर्ट स्कॅम नावाच्या प्रकारानं धुमाकूळ घातला आहे. सेकंड हॅन्ड किंवा प्री ओन्ड कार विक्रीच्या नावाखाली ग्राहकांना लाखोंचा गंडा घातला जातोय.
अश्फाक शेख यांना एक वापरलेली मात्र सुस्थितीतील कार विकत घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी OLX वर सर्च केलं. इथं त्यांना एक हवी तशी कार सापडली. कार मालकाचा फोन नंबरही मिळाला. शेख यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता एक धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर ते सतर्क झालेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले.
तुम्हाला हवी असलेली कार एअरपोर्टच्या डेपोमध्ये ठेवलेली आहे, आणि ती पाहायची असेल तर आधी ९६ हजार रुपये भरा, असे त्यांना सांगण्यात आले. शेख यांना या सगळ्या प्रकाराबद्दल संशय आला. त्यांच्या मुलानं इंटरनेटवरून या प्रकाराची माहिती मिळवली. तेव्हा जुन्या कार विक्रीच्या नावाखाली शेकडो ग्राहकांना गंडा घालण्यात येत असल्याचं समोर आले.
विशेष म्हणजे अशा प्रकारची आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, यासंदर्भात शेख यांचा मुलगा अयानने गूगलवर सर्च केले आणि त्याने चौकसपणे 'एअपरपोर्ट स्कॅम' हा प्रकार काय आहे ते शोधून काढले. अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळेच शेख ही कार पाहायलाही गेले नाहीत आणि पैसेही भरले नाहीत. एवढे सगळे झाल्यानंतर शेख यांनी या भानगडीतच न पडण्याचा निर्णय घेतला. इतरांनीही याबाबतीत सावध राहणे आवश्यक आहे.