लातूर : देशात सर्व जातींसाठी असलेले आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावरील आरक्षण लागू करावे, तसेच अट्रोसिटी कायद्याचा दुरुपयोग होत असल्यामुळे हा कायदाच रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय मराठा समाज पार्टीने केली आहे. हाच मुद्दा घेऊन आगामी विधानसभेच्या २८८ जागा लढविणार असल्याचेही राष्ट्रीय मराठा समाज पार्टीचे अध्यक्ष अंकुश पाटील यांनी लातूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
राज्यात मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढुनही सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसत न टिकणारे आरक्षण दिल्याचा आरोपही यावेळी अंकुश पाटील यांनी केला. त्यामुळेच जातींवरील आरक्षण सरसकट रद्द करून आर्थिक निकषावरील आरक्षणच देशहिताचे राहील असा दावाही यावेळी करण्यात आला. तर अट्रोसिटी कायद्याचा सातत्याने दुरूपयोग केला जात असल्यामुळे हा कायदाही रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या दोन प्रमुख मुद्द्यांना घेऊनच आगामी विधानसभा लढविणार असल्याचे राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुश पाटील यांनी यावेळी जाहीर केले.