पुण्यात पोलिसांसोबतच हिट अँड रन; धक्कादायक CCTV आलं समोर

Pune Hit and Run: पुण्यात कारने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला असून, एक कर्मचारी जखमी आहे. दरम्यान या अपघाताचं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं असून गाडी किती वेगात होती हे दिसत आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 8, 2024, 08:06 PM IST
पुण्यात पोलिसांसोबतच हिट अँड रन; धक्कादायक CCTV आलं समोर title=

Pune Hit and Run: पुण्यातील पोर्श कार अपघातामुळे (Pune Porsche Car Accident) बेदकारपणे वाहनं चालवण्याचा मुद्दा अधोरेखित झाली असताना, पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला आहे. खडकी येथे एका भरधाव वेगाने जात असलेल्या कारने 2 पोलिसांना धडक दिली. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे. दरम्यान या अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलं असून यामध्ये कार धडक देण्यापूर्वी अत्यंत वेगाने जात असल्याचं दिसत आहे. 

सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार, पोलीस कर्मचारी त्यांच्या दुचाकीवर जात होते आणि त्यानंतर तिथून एक स्विफ्ट कार भरधाव वेगाने जात असल्याचं दिसत आहे. या अपघातात खडकी पोलीस ठाण्याचे कर्मचारी समाधान कोळी यांचा मृत्यू झाला आहे. तर पी सी शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार (Mumbai Pune Expressway) जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. तितक्यात मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी शिंदे यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं. समाधान कोळी यांचा मात्र घटनास्थळीच मृत्यू झाला होता. कोळी यांचा मृतदेह पुढं शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.