प्राण्यांवर नजर ठेवण्यासाठी जंगलही होतंय हायटेक!

चोरट्या शिकारींना आळा घालण्यासाठी जंगलात सीसीटीव्हीचं जाळं 

Updated: Dec 8, 2019, 06:46 PM IST
प्राण्यांवर नजर ठेवण्यासाठी जंगलही होतंय हायटेक!
प्रातिनिधिक फोटो

आशिष अम्बाडे, झी २४ तास, चंद्रपूर : आता वन्यजीवांवरही सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. चंद्रपुरातल्या 'कारवा' येथील जंगलात हा अभिनव प्रयोग करण्यात आलाय. यामुळे चोरट्या शिकारींना आळा घालण्यास मोठी मदत होणार आहे. चंद्रपूर शहरालगतच्या कारवा इथल्या जंगलात उभारलेला हा 'सीसीटीव्ही सर्व्हिलान्स प्रकल्प' हाती घेण्यात आलाय. जंगलात सीसीटीव्हीचं जाळंच बसवण्यात आलंय. या सीसीटीव्हीद्वारे वन्यजीवांवर २४ तास करडी नजर ठेवण्यात येते.

राज्यातला हा पहिलाच तर देशातला दुसरा प्रयोग आहे. यामुळे चोरटी शिकार रोखण्यास मोठी मदत होतेय. कारवा येथील वनरोपवाटिकेत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक कक्ष स्थापित करण्यात आलाय. जंगलातील वनतळे, मुख्य मार्ग, पाणवठे अशा निवडक ५ ठिकाणी २५ कॅमेरे लावण्यात आले आहेत. या यंत्रणेमुळे मानवाचा जंगलातील हस्तक्षेप कमी झालाच आहे शिवाय जंलात हस्तक्षेप न करता वन्यजीवांचा अभ्यास करणंही शक्य झालंय, अशी माहिती बल्लारपूरचे वनपरिक्षेत्राधिकारी संतोष थिपे यांनी दिलीय.

ही यंत्रणा सौरउर्जेवर चालते. यामुळे वीजेचा वापर नाही, मानवी गस्तीचा खर्च वाचणार, इतकंच नाही तर शिकाऱ्यांवर अंकुष ठेवणं तसंच जंगलातील घुसखोरी रोखण्यासही मदत होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या आणखी ५ वनपरिक्षेत्रात अशी यंत्रणा बसविण्याची योजना आहे. यासाठी आवश्यक निधीदेखील मंजूर करण्यात आलाय. एकीकडे शहरं स्मार्ट होत असताना आता राज्यातील जंगलंही हळूहळू हायटेक होण्याच्या मार्गावर आहेत.