यापुढे 'ते' 55 जण सतत शरद पवारांसोबत असणार! मोदी सरकारचा मोठा निर्णय

Centre Government Sharad Pawar: केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवारांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला असून बुधवारीच याला पवारांनीही मंजूरी दिली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 22, 2024, 08:49 AM IST
यापुढे 'ते' 55 जण सतत शरद पवारांसोबत असणार! मोदी सरकारचा मोठा निर्णय title=
शरद पवारांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय

Centre Government Update Sharad Pawar : केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता शरद पवारांना केंद्र सरकारकडून सर्वात उच्च श्रेणीतील सशस्त्र सुरक्षा कवच प्रदान केले. अति महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा आता शरद पवारांच्या अवतीभोवती असेल अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आल्याने त्यांच्या भोवती आता 55 जणांचे सुरक्षा कवच असणार आहे.

का दिली सुरक्षा?

गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) शरद पवारांना अधिक भक्कम सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिलेत. राज्याबरोबरच देशातील प्रमुख नेते असलेल्या 83 वर्षीय शरद पवार यांच्या भोवती सुरक्षेचं कडं अधिक मजबूत केलं जाणार आहे. शरद पवारांना सुरक्षा देण्यासाठी 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांची टीम नियुक्त करण्यात आली आहे. केंद्रातील एजन्सींनी केलेल्या धोका मूल्यांकनाच्या आढाव्यानुसार पवारांना मजबूत सुरक्षा कवचाची शिफारस करण्यात आली होती. याचसंदर्भात सीआरपीएफच्या एका टीमने शरद पवारांची बुधवारी भेट घेतली होती.

बुधवारी रात्री झाली महत्त्वाची बैठक

केंद्र सरकारने सीआरपीएफच्या अति महत्त्वाच्या सुरक्षा विंगद्वारे पवारांना झेड प्लस सुरक्षा कवच दिले आहे. सीआरपीएफची एक टीम महाराष्ट्रात या कामासाठी आधीच दाखल झाली आहे. राज्यात सुरु असलेल्या विविध घडामोडींमुळे पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी सायंकाळी शरद पवार यांच्याशी केंद्र सरकारच्या वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी शरद पवारांना सुरक्षा कशी आणि कशासाठी वाढवली जात आहे यासंदर्भातील कल्पना दिल्याचे समजते. अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर शरद पवारंनी सीआरपीएफची सुरक्षा स्वीकारली आहे.

झेड प्लस सुरक्षेमध्ये किती जण असतात? पवारांभोवती 55 जणांचं कडं का?

झेड प्लस कॅटेगरीमध्ये सुरक्षेसाठी 36 जण तैनात असतात. यात दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. एसपीजी सुरक्षेनंतर हे दुसऱ्या दर्जाचे सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. सर्व कमांडोज अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि उपकरणांनी सुसज्ज असतात. शरद पवारांना झेड प्लसबरोबरच यापूर्वी असलेली राज्य सरकारची सुरक्षा कायम राहणार असल्याने पवारांभोवती आता 55 जणांचे कवच असणार आहे. या अशा सुरक्षाचा केंद्राकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. त्यानंतरच अशा सुरक्षेत बदल करण्याचा निर्णय घेतात.