... तरच महाराष्ट्र पोलीस गुन्ह्याची चौकशी करणार का? बलात्कार प्रकरणावरुन कोर्टाने फटकारले

Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. बदालपूर अत्याचार प्रकरणाचाही हवाला देण्यात आला. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 22, 2024, 08:08 AM IST
... तरच महाराष्ट्र पोलीस गुन्ह्याची चौकशी करणार का? बलात्कार प्रकरणावरुन कोर्टाने फटकारले title=
High Court slams cops for shocking lapses in police investigation of sexual assault case

Bombay High Court: राज्यात बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच प्रकरणाचा दाखला देत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारलं आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अल्पवयीन मुलीवर आलेल्या बलात्कार प्रकरणाच्या तपासातील उणिवा लक्षात घेता न्यायालयाने पोलिसांना सुनावलं आहे. 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्यानंतर ती गर्भवती राहिली. साडेचार महिन्यांनी तिचा गर्भपात करण्यात आला. इतकंच नव्हे तर या प्रकरणातील पुरावे मुंबईतील एका खासगी रुग्णालयाने नष्ट केले. यावेळी कोर्टाने बदलापूरच्या आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर झालेला पालकांचा आक्रोश याचा हवाला देत सरकार व पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. 

लोकांनी आंदोलन केल्याशिवाय महाराष्ट्र पोलीस महिला व मुलांवरील गुन्ह्यांची चौकशी करणार का? जोपर्यंत लोक विरोध करत नाहीत तोपर्यंत तुमचा विभाग तपास करणार नाही का?  लोकांनी आंदोलन केल्याशिवाय महिलांवरील गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेणार नाही, असा संदेश महाराष्ट्र राज्य देऊ पाहत आहे का? दररोज कोणत्या ना कोणत्या बलात्काराच्या किंवा पॉक्सोच्या प्रकरणाची सुनावणी घेत आहोत, असं न्यायालयाने सुनावलं आहे. 

अल्पवयीन मुलीवर अत्याचाक करणाऱ्या आरोपीने गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. धक्कादायक म्हणजे पीडितेचा गर्भपात करण्यात आला होता. या प्रकरणात गर्भपाताची प्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई होणे आवश्यक होते. कारण गर्भपाताचे सर्व पुरावे नष्ट करण्यात आले आहे. अत्याचार नेमका कोणी केला हे सिद्ध होण्यास अडचणी होणार आहे. या प्रकरणावरुनच कोर्टाने संताप व्यक्त केला होता. 

दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणी उच्च न्यायालयाने सुमोटो दखल घेतली आहे. या प्रकरणी गुरुवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे उद्या सकाळी तातडीने सुनावणी घेण्यात येणार आहे.