भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या विजय मल्ल्याला अटक केल्यावर कोणत्या तुरुंगात कोणत्या बराकमध्ये ठेवायचे याची तयारी सुरु झाली आहे. भारतात आणल्यानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला ठेवण्यात आलेल्या ठिकाणीच मल्ल्याला ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियासह १७ सार्वजनिक बँकांनी मिळून मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेले ९००० कोटी रुपयांचे कर्ज जानेवारी २०१२ पासून थकित आहे. मल्ल्याला ठेवण्यात येणार असलेल्या कारागृहाची माहिती केंद्र सरकारने लंडन कोर्टमध्ये दिली. आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
आर्थर रोड कारागृहाची ८०४ कैद्यांची क्षमता आहे. मात्र सध्या तिथे २५०० कैद्यांना ठेवण्यात आल्याची गंभीर स्थिती सध्या या कारागृहाची आहे.
मल्ल्याला भारतात आणण्याची भारताकडून आवश्यक ती तयारी सुरु झाली आहे. तुरुंग प्रशासनाने हा अहवाल तयार करून सरकारला सादर केला आहे. हा अहवाल सीबीआयमार्फत वेस्टमिनिस्टर न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. याच कोर्टात मल्ल्याचा प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. अहवालात तुरुंगातील बराकीच्या अवस्थेबाबत तसेच सुरक्षेबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून लंडन कोर्टात हा प्रत्यार्पण खटला जलदगतीने होईल.