18 February 2024 Weather Update: राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल झालेला दिसून येतोय. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील काही भागांमधून थंडी गायब झाल्याचं चित्र दिसून येतंय. तर दुसरीकडे हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये किमान तापमानात वाढ होण्याचीही शक्यता आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, कोकणाव्यतिरिक्त राज्याच्या उर्वरित भागात तुरळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी पुढील चार-पाच दिवस राज्यातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. याशिवाय आज एक पश्चिमी प्रकोप हिमालयाकडे येत असल्याने किमान तापमानात पुढील दोन-तीन दिवसात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
आजपासून ते 20 तारखेपर्यंत वेळोवेळी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असल्याचंही हवामान खात्याने सांगितलंय. तर 21 तारखेनंतर राज्यांमध्ये येणाऱ्या उत्तरी वाऱ्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 3 ते 4 दिवसांत हवामान बदलणार आहे. पाऊस आणि गारपिटीसह जोरदार वारेही वाहणार असून त्याचा परिणाम दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येणार आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार, ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, 17 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता आहे.
उत्तर भारतातील काही भागात ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यातप्रमाणे हिमाचल प्रदेश आणि जूम्मू आणि काश्मिर आणि लडाख, गिलगीट या भागांमध्ये मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केलीये.