सिंधुदूर्ग : काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाजप नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. जर नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असतील तर प्रसंगी त्यांच्यासाठी मंत्रीपद सोडण्याची तयारी असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं आहे.
नारायण राणे यांना चंद्रकांतदादांकडून ही मंत्रीपदाची खुली ऑफर असल्याचं बोललं जात आहे.
चंद्रकांत पाटील हे कोकणातील सावंतवाडीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा कुठलाही मुहूर्त अजून ठरलेला नाही, दरम्यान, नारायण राणे यांच्या सारख्या माजी मुख्यमंत्र्यांना पक्षात घेण्याचा मोठा निर्णय केंद्रीय स्थरावर घेतला जाईल, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, नारायण राणे यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. नारायण राणे हे पहिल्यांदा युती शासन आल्यानंतर मनोहर जोशी यांच्या नंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते, त्यानंतर नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेनेसा जय महाराष्ट्र केला होता.
यानंतर नारायण राणे काँग्रेसमध्ये दाखल झाले, त्यावेळी त्यांनी मंत्रीपद देखील भूषवलं होतं. आता पुन्हा नारायण राणे काँग्रेसच्या वाटेवर जातील, अशा चर्चेला उधाण आलं आहे.