नेत्यांच्या वादात काँग्रेसची ध्वजारोहणाची परंपरा तुटली

स्वातंत्र्यदिनी खरंतरं सारे रागलोभ विसरून एकत्र येण्याचा दिवस...

Updated: Aug 16, 2017, 06:24 PM IST
नेत्यांच्या वादात काँग्रेसची ध्वजारोहणाची परंपरा तुटली  title=

चंद्रपूर : स्वातंत्र्यदिनी खरंतरं सारे रागलोभ विसरून एकत्र येण्याचा दिवस...पण चंद्रपूर काँग्रेसच्या नेत्यांना मात्र तसं काही वाटत नाही. कारण ध्वजारोहण कुणी करायचं या वादात अडकलेल्या वडेट्टीवार आणि पुगलियांनी काँग्रेसची ध्वजारोहणाची परंपराच यंदा मोडीत काढली.

आमदार विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांच्यातला वाद इतका विकोपाला गेलाय की स्वातंत्र्यदिनानिमित्त काँग्रेसच्या पक्षाचा अधिकृत ध्वजारोहणाचा कार्यक्रमच होऊच शकला नाही. गेली सत्तर वर्ष सातत्यानं चंद्रपूरच्या गांधी चौकात जयस्तंभाजवळ काँग्रेसचं अधिकृत झेंडावंदन होतं. पण यंदा झेंडा कुणी फडकावायचा यावरून वाद झाला.

वडेट्टीवार आणि पुगलिया दोघांनीही शड्डू ठोकले. मग कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून प्रशासनानं निर्धारित वेळेआधीच ध्वजारोहण आटोपलं. झेंडावंदनासाठी आलेल्या निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांचा मात्र यामुळे भ्रमनिरास झाला. पक्षाची परंपरा खंडित झाल्याचा संताप त्यांनी नेत्यांवर काढला. तर पुगलीयांनी काँग्रेसचा झेंडावंदानाचा मान पालकमंत्र्यांनी हिरावून घेतल्याचा आरोप केलाय. पालकमंत्र्यांच्या दबावात प्रशासानानं झेंडावंदन उरल्याचा पुगलियांचा दावा आहे.

पक्षाची सात दशकांची परंपरा मोडल्याचा संताप आणि दुसरीकडे स्वतंत्र्यदिनाचा उत्साह अशा द्विधा मनस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वजाला वंदन केलं. पण नेत्यांच्या कुरुबुरींमुळे पक्षाचा मान हिरावला गेल्याचं दुःख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं होतं.