आशीष अम्बाडे, झी २४ तास, चंद्रपूर : चंद्रपूर शहरवासियांना हैराण करणाऱ्या एका माकडाला जेरबंद करण्यात वनविभाग बचाव दलाला यश आलंय. या माकडानं गेल्या दोन दिवसांत जवळपास १० नागरिकांचा चावा घेतला होता. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ या गजबजलेल्या भागात या माकडानं उच्छाद मांडला होता. वनविभागाच्या तज्ज्ञ पथकानं माकडाला बेशुद्धीचे इंजेक्शन मारून जेरबंद केले.
हल्लेखोर माकडांपैकी एक माकड ताब्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर दुसऱ्या हल्लेखोर माकडाला ताब्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वनविभाग बचाव दलाचे प्रमुख प्रसन्न बडकेलवार यांनी दिली.
आज सकाळीदेखील माकडाने हल्ला करत वर्षा आत्राम या महिलेला जखमी केले होते. माकडांच्या उच्छादामुळे अत्यंत गजबजलेला हा परिसर संचारबंदी लावल्यासारखा दिसत होता.
घनदाट वस्ती असल्याने बंदुकीतून बेशुद्धीचे इंजेक्शन मारताना पथकाला मोठी अचूकता आणावी लागली. तब्बल २४ तासांनी हल्लेखोर माकड जेरबंद झाले असले तरी दुसऱ्या माकडाचा उच्छाद कधी थांबेल? असा प्रश्न नागरिकांना पडलाय.