आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातील पोंभूर्णा-चिंतलधाबा रस्त्यावरील सोनापूर फाट्याजवळ भीषण अपघात (Chandrapur Accident) झाला आहे. या अपघातात दोन तरुणांचा जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोंभूर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. शुल्लक चुकीमुळे दोन तरुणांना जीव गमवावा लागल्याने चंद्रपुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आनंद बोलमवार (23 रा. पोंभूर्णा) अमन भोयर (21 रा. मुल) अशी मृत तरुणांची नावे असल्याचे समोर आले आहे. तर गोलू देशमुख ,लक्ष्मण बावणकर, ड्रायव्हर गितेश्वर बावणे, आयुष लाकडे अशी गंभीर जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. विठ्ठलवाडा येथील कार्यक्रमात डिजे वाजवण्यासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. अपघातामध्ये टाटा एस गाडी अनियंत्रित होऊन झाडाला धडकली आणि दोघांचा मृत्यू झाला.
महामार्गावर गाडी बाजूला घेत असतानाच वाहन चालकाची चप्पल एक्सलेटरमध्ये अडकली आणि गाडी अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. यातील मृतक आनंद बोलमवार हा डीजे ऑपरेटर होता. पोंभूर्णा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू
दुसरीकडे, पालघरमध्ये खड्ड्यात पडून एका 17 मुलाला जीव गमवावा लागला आहे. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा ठेका असलेल्या मोंटो कार्लो या कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात हा मुलगा पडला होता. दीप सुनील शेलार असे या 17 वर्षीय युवकाच नाव असून तो पालघर मधील बोरशेती येथील रहिवासी होता. पाय घसरून दीप या खड्ड्यात पडला असून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात मनोर पोलीस ठाण्यात एडीआर दाखल झाला असून मनोर पोलीस अधिक तपास करत आहेत . या सगळ्या घटनेमुळे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा ठेका असलेल्या कंपन्यांचा मनमानी कारभार आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
दरम्यान, जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे 12 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला आहे. संजीव बाशीराम झमरे असे मृत्यू झालेल्या 12 वर्षीय मुलाचे नाव असून तो रात्री लघुशंकेसाठी घराच्या बाहेर आला होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने या मुलावर हल्ला केला आहे. मध्य प्रदेश मधील हे कुटुंब शेतात मजूर काम करण्यासाठी ओतूर येथे आले होते यावेळी ही घटना घडली. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठविला आला आहे. तर वनविभागाकडून या परिसरात हल्ले रोखण्यासाठी पिंजरे लावण्यात येणार आहे.