आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील एका डबक्याजवळ 3 मुले बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरातील डबक्याजवळ हा सर्व प्रकार घडला आहे. अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या डबक्यात पोहोण्यासाठी तीन मुले उतरल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पोहोतानाच या शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे बराच वेळ मुले न परतल्याने पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली आहे. मात्र कोणतीही माहिती न मिळाल्याने शुक्रवारी पुन्हा शोध सुरु करण्यात आला आहे.
अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील शाळेत शिकणारी दहा वर्षाची तीन मुले सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी शोधाशोध सुरु केली होती. ही तिन्ही मुले एकाच वर्गाच शिकण्यासाठी होती. दरम्यान संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या डबक्याजवळ मुलांचे कपडे आणि इतर साहित्य आढळून आले. यावरून ही मुले डबक्याच्या पाण्यात पोहण्यासाठी गेली असावी असावा अंदाज लावण्यात आला. बराच वेळ मुलांचा पत्ता न लागल्याने ती डबक्याच्या पाण्यात बुडाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर अल्ट्राटेक कंपनी व्यवस्थापन व गडचांदूर पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली. मात्र, काहीही शोध लागला नाही. रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र अंधार झाल्याने बचाव पथकाला मुलांचा शोध घेताना अडचण येत होती. त्यामुळे रात्री शोध थांबवण्यात आली. शुक्रवारी पहाटे पासूनच शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
तलावात बुडून पशुपालकाचा मृत्यू
दरम्यान, तलावावर बैलांना अंघोळ घालण्यासाठी गेलेल्या पशू पालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे घडली आहे. मृतकाचे नाव नंदकुमार बाळकृष्ण पटले (52) आहे. मृतक नंदकुमार पटले हा अल्पभूधारक शेतकरी असून पशू पालन करतात. सकाळी ते आपली बैलजोडी धुण्याकरता गावातील मामा तलावावर गेले होते. मात्र बराच वेळ नंदकुमार घरी न परतल्याने आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केला. यावेळी नंदकुमार यांचा मृतदेह तलावातील दिसून आला. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून प्रशासनाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढत लाखनी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.