मुंबई : चंद्रपुरातील सिरणा नदीतपात्रात पडून जखमी झालेल्या वाघाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटे या वाघाचा मृत्यू झाला. वाघाला वाचवण्यासाठी सुरु असणाऱ्या मोहिमेत बुधवारी सूर्यास्तानंतर अंधार पडण्यास सुरुवात झाल्यामुळे अडथळे बचावकार्य थांबवण्यात आलं. सकाळी हे बचावकार्य पुन्हा सुरु होण्यापूर्वीच वाघाचा मृत्यू झाला. पुलाखाली उडी मारल्यामुपळे हा वाघ जायबंदी झाला होता.
बुधवारी अगदी पहाटे दोन चारचाकी वाहनं विरुद्ध दिशेने येत होती, त्याचवेळी पुलावर असलेला वाघ घाबरला, काहीसा गोंधळला आणि त्याच आवेगात त्याने पुलाखाली उडी घेतली. उडी घेतल्यानंतर नदीच्या खडकाळ पात्रात पडून अडकल्या तो वाघ जबर जायबंदी झाला आणि अखेर गुरुवारी पहाटे या जखमी वाघाचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून या वाघाने येथील परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केल्याचं म्हटलं जात होतं.
सिरणा नदीच्या पात्रात पडलेल्या या वाघाला वाचवण्यासाठी सुरु असणारं बचावकार्य नेमकं का थांबवण्यात आलं हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्नच आहे. अंधार पडल्याचं कारण देत बचावकार्यात अडथळे आल्याचं सांगण्यात आलं. पण, यावर मार्ग काढत मधील काही तासांमध्येच हे बचावकार्य सातत्याने सुरु ठेवण्यात आलं असतं, तर आज ही घटना घडली नसती.
दरम्यान, सिरणा नदीचं पात्र हे खडकाळ असल्यामुळे हा वाघ जबर जखमी झाला होता. त्यातही त्याला नेमकी कुठे दुखापत झाली हे कळू शकत नव्हतं. त्याला वाचवण्यासाठी बचावकार्यादरम्यान, एक पिंजराही पात्रात सोडण्यात आला होता, जेणेकरुन वाघ त्या पिंजऱ्या येऊ शकेल. पण, वाघाला त्या पिंजऱ्यात जाता आलं नाही.
नदी पात्रात कोणत्याही वन्य जीवाला डार्ट मारुन बेशुद्ध करता येत नाही, कारण पाणी प्राशन केल्यांतर त्या वन्यजीवाचा मृत्यूही संभवतो. त्यामुळे वाघाने स्वत:हून पिंजऱ्यातत यावं हा एकच मार्ग होता. पण, अती रक्तस्त्रावामुळे आणि दीर्घकाळ पाण्यात राहिल्यामुळे अखेर त्या जायबंदी वाघाचा दुर्दैवी अंत झाला.