आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर: शालेय वयात विद्यार्थी अभ्यास आणि मोठं काहीतरी करुन दाखवण्याचे दडपण घेतात आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. याचा विपरित परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो. याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. चंद्रपुरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊन का उचचले असा प्रश्न सर्वजण उपस्थित करत आहेत.
आत्महत्या केलेला विद्यार्थी हा चंद्रपुरातील ख्यातनाम खासगी मिशनरी शाळेत शिकत होता. सार्थक असे या विद्यार्थ्याचे नाव असून नववी इयत्तेत होता. त्याने घरीच गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पालकांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली.
अभ्यासाचा प्रचंड दबाव आणि शाळा कोचिंग क्लासेस येथील अभ्यास आत्महत्येसाठी कारणीभूत ठरल्याची माहिती देण्यात आली आहे.
या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी चंद्रपूर शहरातील हनुमान खिडकी भागातील विद्यार्थ्याचे कुटुंबीय आणि शाळेतील शिक्षक यांचे जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.
सार्थक हा तसा अगदी सर्वसामान्य दिसणारा विद्यार्थी होता. तो असे काही करेल असे कधीच वाटले नव्हते. मात्र अभ्यास आणि सिद्ध करण्याचा दबाव यामुळे तो पुरता कोलमडला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नववीतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने पालक वर्तुळात मात्र चिंतेचे वातावरण आहे.