Chandrayaan-3 Viral Video: सध्या सर्व भारतीयांचे लक्ष इस्त्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेवर लागून राहिले आहे. येत्या दोन दिवसांत चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. त्यामुळं भारतीयांच्या चांद्रयान-३ मोहिमेकडून अनेक अपेक्षा आहेत. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटोही शेअर केले आहेत. चंद्रावर असलेले खड्डे हेदेखील संशोधनाचा विषय असणार आहे. चांद्रयान चंद्रापासून अवघे 25 मीटर दूर असतानाच सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा पहिला भारतीय, असं या व्हिडिओत म्हटलं आहे. काय आहे हा व्हिडिओ जाणून घेऊया.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय, 21 तोफांची सलामी, असं कॅप्शन टाकण्यात आलं आहे. यात एका व्यक्तीने अंतराळवीरासारखा ड्रेस परिधान केला आहे आणि खड्ड्यातून हळूवारपणे चालताना दिसत आहे. सुरुवातीला खरंच हा व्यक्ती चंद्रावर असल्याचा भास होत आहे. मात्र प्रत्यक्षात हे खरं नाहीये.
व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्यानंतर कळतं की हा व्हिडिओ चंद्रावरील नसून एका रस्तावरील आहे. व्हिडिओच्या शेवटी शेवटी त्या व्यक्तीच्या जवळून गाड्या जाताना दिसत आहेत. त्याचबरोबर खड्ड्यातील दगडही दिसत आहेत. व्हिडिओ पाहून अनेकांना बसू आवरता आलं नाहीये. त्याचबरोबर ज्या अँगलने हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. त्यामुळं खरंच चंद्र असल्याचा भास होत आहे.
चांद्रयान -३ मोहिम आणि महाराष्ट्रात पावसामुळं पडलेले खड्डे या दोन्ही गोष्टी सध्या चर्चेत आहेत. सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत खड्ड्यांचे साम्राज पसरले आहे. खड्ड्यांमुळं अनेक अपघातदेखील होत आहेत. तर, वाहतुक कोंडींचा त्रासही सहन करावा लागत आहे. अलीकडेच, मुंबई-गोवा महामार्गाची झालेल्या दुरावस्थेचे फोटोही समोर आले होते. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीकाही केली होती. कधी कधी वाटते, चांद्रयान करून काय फायदा, चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत; तर महाराष्ट्रात पाठवायचे ना... खड्डे येथेही दिसले असते आणि खर्चही वाचला असता, असं राज ठाकरे म्हणाले होते.
दरम्यान, चांद्रयान-३ चंद्राच्या अंतिम कक्षेत पोहोचले असून 17 ऑगस्टपासून चांद्रयानने चंद्रावर लँडिगची प्रोसेस सुरू केली आहे. 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६च्या सुमारास चंद्रावर सॉफ्ट लँडिग होणार आहे. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असणार आहे.